गावकारभाऱ्यांना मोर्चेबांधणीला मिळणार वाव

मांडवगण फराटा (वार्ताहर) – करोनाच्या महामारीमुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. करोनामुळे एप्रिल, मे आणि जून ते डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक होणार आहे. त्यामुळे नव्याने होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटलेल्या पहिलवानांच्या चेहऱ्यावर “कही खुशी कही गम’ पाहावयास मिळत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा गाजवण्यासाठी जाणकार तर काही नवख्या पहिलवानांनी सगेसोयरे, भावकी, पै-पाहुणे यांच्याकडे साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून मनोमिलन घडवून आणले आहे. जाणकारांनी ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता राखण्यासाठी तर युवकांनी नव्याने राजकारणात प्रवेश मिळण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. परंतु सध्या करोनाचे महाभयंकर संकट फोफावत असल्याने वाढणारी जोखीम लक्षात घेता नव्याने होणाऱ्या निवडणुकांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वातावरणातील हवेत शिथिलता आली आहे.
पूर्व भागातील इनामगाव, वडगाव रासाई, तांदळी, सादलगाव, बाभूळसर बुद्रुक, शिरसगाव काटा, गणेगाव दुमाला, कोळगाव डोळस, कुरूळी, नागरगाव, आंधळगाव या ग्रामपंचायतीचा कालावधी जून महिन्यात पूर्ण होत आहे. या निवडणुका पुढील महिन्यात होऊ घातलेल्या होत्या. परंतु करोनामुळे ग्रामपंचायतीवर आता प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांना मात्र आता मोर्चेबांधणी करण्यासाठी पुरेसा वेळ
मिळणार आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छुकांना मोर्चेबांधणी करता येणार आहे. विद्यमान सरपंचांनी करोना काळात आपल्या कामाची चुणूक दाखवलेली आहे.
– मनीषा शेलार, सरपंच, नागरगाव





