यशवंतनगर – कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर येथे प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या टप्पा क्र. 2 अंतर्गत प्रतीक्षा यादीतील 29 लाभार्थ्यांना ग्रामसेविका पुष्पा कोळी यांनी बोगस ग्रामसभेच्या ठरावाद्वारे अपात्र ठरवल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अरविंद डुबल, शंकर डुबल यांच्यासह नागरिकांनी घरकुले पात्र करून मंजुरी पत्र मिळावे किंवा अपात्र लाभार्थ्यांच्या घरकुल रकमेची वसुली ग्रामसेविका, सरपंच आणि उपसरपंचांकडून करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, खोटी ग्रामसभा घेतल्याबद्दल ग्रामसेविका यांना बडतर्फ करण्याची मागणीही केली आहे. ग्रामस्थांच्या अन्य मागण्या -2020 पासूनचा मागासवर्गीय 15% निधी मागासवर्गीय समाजासाठी खर्च करावा. -ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. -ग्रामसेविका यांची बायोमेट्रिक हजेरी आणि गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा. -मागासवर्गीय समाजातील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करावी. -ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची (14 व 15 वित्त आयोग, ग्रामनिधी, पाणीपुरवठा) खातेनिहाय सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. दरम्यान, या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन सुरू केले असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराविरोधात आणि घरकुल योजनेतील अन्यायाविरुद्ध हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या मागे घेतला जाणार नाही.