कापूरहोळ : (ता. भोर) गावात उल्हास शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा १९९१ चालू आहे. काही दिवसांपासून शाळा प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये शाळेच्या जमिनीवरून वाद सुरू आहेत. सोमवारी (दि.९) शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत आल्यावर काही गावकऱ्यांनी शाळेतून घरी हाकलून दिले आणि वर्ग खोल्यांना टाळे ठोकले. या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या बाबत माहिती अशी की, उल्हास शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत ३१६ विद्यार्थी शिकत आहेत व १५ कर्मचारी आहेत. गावच्या देवस्थानने शिक्षण संस्थेला ६० गुंठे जमिनीचा सातबारा करून दिलेला आहे. त्या जागेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ही जागा वापरात असल्याचा दावा शिक्षण संस्थेने केला आहे. शाळेच्या नावावर एकूण १५५ गुंठे असून पैकी ६० गुंठे जागा वापरात असून उर्वरित जमीन वापरात नाही. भैरवनाथ देवसंस्थानाने उर्वरित ही जागा संस्थेला बक्षीस पत्र दिलेली आहे. पण काही जागा वापरात नसल्याने ती जागा देवस्थान ट्रस्टच्या नावावर करण्यासाठी हे प्रकरण गेल्या १५ ते २० वर्षांपासून धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहे. यावरूनच संस्था आणि गावकरी यांच्यात वाद सुरू झाला असून गावकऱ्यांनी या प्रकरणी रोष व्यक्त करीत शाळेला कुलूप लावले. गेल्या अनेक वर्षांपासून ३० गुंठे जमीन शाळेने स्वःताच्या नावे करुन उर्वरित जमिन ट्रस्टच्या नावे करावी, अशी मागणी गावकऱ्यांची आहे. शाळेच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने सदर कृती करावी लागली असे नागरिक सांगत आहेत.तर शालेय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास बांदल यांनी सांगितले की, गावातील ग्रामस्थ कागदोपत्री पूर्तता करीत नाहीत म्हणून धर्मदाय आयुक्त यांच्याकडे ही बाब प्रलंबित आहे. आक्रमक निर्णयाची झळ विद्यार्थ्यांना सदर जागेवरून शाळा आणि वरवे गावातील ग्रामस्थ आणि ट्रस्ट यांच्यात वाद चांगलाच उफाळून आला आहे. या शाळेत आसपासच्या गावातील विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळा बंद केलेल्या आक्रमक निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यामुळे वादाची झळ विद्यार्थ्यांना का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. राजकीय प्रेरित हेतूने काही ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आहेत. शाळेची बदनामी करण्याचे काम जाणीवपूर्वक केलं जात आहे. याबाबत आम्हाला नाहक त्रास दिलेला जात आहे. होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाला सर्वस्वी ग्रामस्थ जबाबदार असतील. – विलास बांदल, संस्थेचे अध्यक्ष