पिंपरी | ग्रामस्थांनी रोखला मुंबई-पुणे महामार्ग

कामशेत, (वार्ताहर) – नायगाव येथील चोपडे दाम्पत्याचा जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव कारने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता. या अपघातामुळे संपूर्ण मावळ तालुक्यात संतापाची लाट उसळली होती.
यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी एमएसआरडीसी सह संबंधित प्रशासनाकडे सेवा रस्ता करणे, अपघाताचा तपास करणे आदी मागण्यांचे निवेदन देत रास्ता रोकोचा इशारा दिला होता.
त्यानंतर शुक्रवारी (दि.११) सुमारे हजारो ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला मागण्यांचे गांभीर्य दाखवून दिले.
शनिवारी (दि.५) रात्री साडेदहाच्या सुमारास चोपडे दाम्पत्याचा अपघात झाला होता. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंधारात अपघात घडल्याने कार चालकाला शोधणे हे मोठे आव्हान होते.
मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करून आरोपीला तळेगावातून अटक केली. मात्र महामार्गाबाबत असणारे इतर प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित असल्याने शुक्रवारी संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.
यानंतर कामशेत ते वडगाव दरम्यान सर्व्हिस रोड करणे सोबत इतर काही मागण्यांचे निवेदन एमएसआरडीसी अधिकारी, तहसीलदार यांना देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या काय?
१. कान्हे ते कामशेत, कामशेत ते कान्हे फाटा सर्व्हिस रोड करणे.
२. नायगाव गावाजवळील महामार्गावरील तीव्र चढउताराचे क्रॉसिंग सपाट करणे.
३. नायगाव येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महामार्गावर उड्डाणपुल बांधणे. सध्या तात्पुरत्या लोखंडी पूल करणे.
४. रस्ता क्रॉसिंगवर स्पीड ब्रेक बसविणे.
५. नायगाव येथील पेट्रोल पंपाजवळील अनधिकृत दुभाजक बंद करणे.





