Vilas Ghule Case : एसआयटीला मोठं यश ! विलास घुले हत्याप्रकरणात ‘हा’ महत्वाचा पुरावा लागला हाती
बीड जिल्ह्यातील केज शहरात काही दिवसांपूर्वी दोन गटांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या विलास घुले (Vilas Ghule Case) या निष्पाप हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

Vilas Ghule Case : बीड जिल्ह्यातील केज शहरात काही दिवसांपूर्वी दोन गटांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या विलास घुले (Vilas Ghule Case) या निष्पाप हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट असून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शासनाने याच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच ‘एसआयटी’ची नियुक्ती केली आहे. या प्रकरणाचा एसआयटीकडून (Vilas Ghule Case) कसून तपास सुरू असतानाच आता पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचे पुरावे लागले आहेत, ज्यामुळे आरोपींच्या अडचणीत मोठी वाढ होणार असून तपासाला देखील वेग येणार आहे.
तपासादरम्यान एसआयटीने कारवाई करत आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे. हत्येच्या दिवशी आरोपी याच चारचाकी वाहनातून घटनास्थळावर दाखल झाले होते. यासोबतच, ज्या धारदार चाकूने विलास घुले यांच्यावर प्राणघातक वार करण्यात आले होते, तो मुख्य चाकू देखील शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरोपीने हा चाकू एका शेतात लपवून ठेवला होता, जिथून एसआयटीने तो हस्तगत केला. गुन्ह्यातील वाहन आणि मुख्य हत्यार पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या प्रकरणातील हा अत्यंत भक्कम भौतिक पुरावा मानला जात आहे.
या हायप्रोफाइल हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर एसआयटीने सौरव सोनवणे यांची सखोल चौकशी देखील केली आहे. राजकीय नेत्याच्या मुलाचे नाव यात आल्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच मृत विलास घुले यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. या गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली होती.
काय होते नेमकं प्रकरण?
विलास घुले हे केज परिसरातील एक प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक होते. घटनेच्या दिवशी त्यांच्या परिसरात दोन गटात जोरदार भांडण सुरू होते. एक सुजाण नागरिक म्हणून विलास घुले हे या दोन गटांमधील वाद मिटवण्यासाठी (Vilas Ghule Case) आणि मध्यस्थी करण्यासाठी तिथे गेले होते. मात्र, संतप्त झालेल्या आरोपींनी वाद मिटवण्याऐवजी विलास घुले यांच्यावरच धारदार शस्त्राने हल्ला चढवला.
या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीचा अशा प्रकारे जीव गेल्याने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती, मात्र आता एसआयटीच्या हाती लागलेल्या महत्त्वाच्या पुराव्यांमुळे या प्रकरणाचा छडा लवकरच लागण्याची शक्यता आहे.





