विक्रांत नौका भ्रष्टाचार: किरीट सोमय्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर

मुंबई – नौदलाची आयएनएस विक्रांत नौका वाचवण्याच्या नावाने लोकांकडून पैसे जमवून त्याचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, आज सकाळी अकरा वाजता सोमय्या हे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या समोर उपस्थित राहिले.
सोमय्या यांनी या प्रकरणात 57 कोटी रूपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात एका माजी सैनिकाने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सोमय्या यांना अंतरीम जामीन मंजुर करताना मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना 18 एप्रिल पासून चार दिवस तपास अधिकाऱ्यांपुढे हजर राहण्याचा आदेश दिला होता.
त्यानुसार आज पासून त्यांची ही चौकशी सुरू झाली आहे. रोज सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सलग चार दिवस त्यांची ही चौकशी चालणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमय्या हे अटकपुर्व जामीन मिळेपर्यंत फरारीही झाले होते.




