कल्याण : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी छोट्या पडद्यावरील मालिकांच्या घसरत जाणाऱ्या दर्जावरुन प्रेक्षकांना परखड असा सल्ला दिला आहे. गोखले यांनी, “प्रेक्षकांनी स्वत:चा चॉईस तपासून पहा, निश्चित करा, त्याच्यावर बंधने घाला आणि भिकार सिरीयल पाहणे बंद करा, तुमचा वेळ वाया घालवू नका, तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगल्याच्या मागे लागतील. म्हणजे मग चांगले दिग्दर्शक, नट लेखक येतील म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, सिरीयल नक्की पहा असे आवाहन राज्यभरातील प्रेक्षकांना विक्रम गोखले यांनी केले. कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत दुसऱ्या पुष्पात ते बोलत होते. विक्रम गोखले यांनी प्रेक्षकाशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीपासूनच प्रसार माध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली. डिजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकाच्या माथी मारले जात आहे. आज प्रसार माध्यमे पैशाच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडल्याचे गोखले यांनी सांगितले. आज कोणताही अर्थ नसलेल्या सिरीयल घाल पाणी, घाल पीठ या न्यायाने प्रेक्षकाच्या माथी मारल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “अखिल महाराष्ट्राचा नम्र विनंती आहे की आपण कुठल्या पद्धतीच्या मालिका बघतोय, टीव्हीवर काय बघतोय, त्यात काही तथ्य आहे का? की तथ्यहीन काही बघत रहायचं का?,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रसारमाध्यमं ही सध्या घरातील काम करत बघण्याची गोष्ट झालीय असा टोलाही विक्रम गोखलेंनी लगावला. “मीडिया हा कसाय माहितीय का? भाजी मोडता मोडता बघत रहाणे. पोराला खायला घालता घालता बघत रहाणे, घरकाम करताना बघत रहाणे. तुम्ही सिनेमागृहात केल्यानंतर असले चाळे, असले संवाद मारु शकत नाही. तिथे लोक म्हणतील आम्हाला सिनेमा बघायचा आहे, गप्प बसा किंवा बाहेर जा. तिथे ज्यापद्धतीची शांतता हवी असते तशी शांतता राखूया आपण हे बघताना. या लायकीच्या मालिका आहेत का इथे? काय बघतोय आपण?,” असे प्रश्न प्रेक्षकांनी स्वत:ला विचारले पाहिजेत. करोना काळाचे वर्णन करणारी शॉर्ट फिल्म वैकुंठ दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तयार केली असून ही अतिशय विदारक सत्यावर आधारित असून अशी कलाकृती निर्माण केल्याबद्दल गोखले यांनी त्यांचे कौतुक केले. सोबतच आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल असे सांगितले.