‘हिंदुस्थानी भाऊ’ला चार दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई – दहावी-बारावीचे विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकवल्या प्रकरणी विकास पाठक वर (हिंदुस्थानी भाऊ) कारवाई करत मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी पाठकला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोमवारी राज्यभरात दहावी-बारावीच्या परिक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या, या मागणीसाठी लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर विकास पाठक आणि इकरार खान वखार खान यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोघांना धारावी पोलिसांनी अटक केली होती.
काल म्हणजेच सोमवारी मुंबईतील धारावीमध्ये तसेच राज्यातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. करोनाच्या संकटात 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑनलाइन कराव्यात, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. ऑफलाइन परीक्षा घेण्यास विद्यार्थ्यांचा विरोध आहे. दरम्यान, आता विकास पाठक याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.





