केंद्र सरकारच्या ‘या’ धोरणांना अभिनेता विजयचा विरोध, पक्षाने मंजूर केला ठराव

चेन्नई – तमिळनाडूच्या द्रमुक सरकारने तीन भाषा धोरण आणि सीमांकनाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरुद्ध आघाडी उघडली आहे. आता प्रसिद्ध चित्रपट अभिनेता विजय यांचा पक्ष तमिलगा वेत्री कळघम नेही (टीव्हीके ) त्याविरुद्ध ठराव मंजूर केला आहे. या प्रस्तावात वक्फ दुरुस्ती विधेयकालाही विरोध करण्यात आला आहे. याबाबत टीव्हीकेची एक बैठक झाली. त्यामध्ये असे ठरले की, टीव्हीके हा पक्ष केंद्र सरकारला वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घेण्यासाठी आवाहन करेल. टीव्हीकेची पहिली कार्यकारी परिषदेची बैठक तिरुवनमयूर येथे सुरू आहे.
त्रिभाषा धोरणाला विरोध करताना, टीव्हीकेने म्हटले आहे की पक्ष द्विभाषा धोरणाशी वचनबद्ध राहील आणि नवीन शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा धोरणाला विरोध करेल. हे धोरण संघराज्याच्या भावनेविरुद्ध आहे आणि टीव्हीके कधीही भाषेची अशी लादणी सहन करणार नाही. शिवाय, नव्याने येत असलेले प्रस्तावित सीमांकन राज्याला आवश्यक नाही. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमधील लोकसभेच्या जागांची संख्या कमी होऊ शकते.
टीव्हीकेने श्रीलंकेच्या नौदलाकडून तामिळनाडूच्या मच्छिमारांना अटक केल्याचा मुद्दाही उपस्थित केला आणि ठरावात या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. पक्षाने मच्छिमारांना पाठिंबा दिला. या प्रस्तावात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या मच्छिमारांप्रमाणे तामिळनाडूच्या मच्छिमारांना समजून घ्यावे आणि मच्छिमारांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा.
दरम्यान, बैठकीच्या ठिकाणाबाहेर पक्षाचे नेते विजय यांचे मोठे होर्डिंग्ज आणि कटआउट्स लावण्यात आले आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये अभिनेता विजयने आपल्या राजकीय पक्षाची घोषणा केली आणि राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.





