Actor Vijay : अभिनेते विजय यांच्या पक्षाला मिळाले ‘शिट्टी’ चिन्ह; स्वतः धरला होता शिट्टी चिन्हाचा आग्रह
तमिळ अभिनेते विजय यांनी स्थापन केलेल्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाला शिट्टी हे चिन्ह मिळाले.

Actor Vijay – तमिळ अभिनेते विजय यांनी स्थापन केलेल्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाला शिट्टी हे चिन्ह मिळाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने मनपसंत चिन्ह दिल्याने त्या पक्षाच्या गोटात उत्साह संचारला आहे.
टीव्हीके समोर १० चिन्हांचा पर्याय होता. त्या पक्षाने शिट्टीला प्राधान्य दिले होते. शिट्टी असा अर्थ असणारा एक तमिळ चित्रपट विजय यांनी केला होता. त्याशिवाय, त्यांच्या हिट चित्रपट गीतांमध्ये शिट्टीवर आधारित एका गीताचा समावेश आहे. त्यामुळे टीव्हीकेने शिट्टी चिन्हाचा आग्रह धरला होता.
आता हवे ते चिन्ह त्या पक्षाला मिळाले आहे. त्यामुळे आणखी उत्साहाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यास टीव्हीके सज्ज झाला आहे. ती निवडणूक चालू वर्षी मार्च-एप्रिलमध्ये अपेक्षित आहे.
तमिळनाडूत द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या नेतृत्वाखालील आघाड्यांमध्येच प्रामुख्याने निवडणुकांत मुकाबला रंगतो. मात्र, विजय यांच्या राजकीय एन्ट्रीमुळे यावेळी त्या राज्यात तिरंगी लढत होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. विजय यांच्या टीव्हीकेने तूर्त तरी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे.





