मुंबई : राज्यात हनी ट्रॅपची सध्या जोरदार चर्चा सुरु असताना, या संदर्भात रोज नवीन खुलासे होत आहेत. कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हा विषय विधीमंडळ अधिवेशनात मांडला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टी फेटाळून लावल्या होत्या. मात्र, रोज होणाऱ्या नवीन खुलाशांमुळे राज्य शासनाच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र आहे. यातच कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाचा लवकरच खुलासा होणार असून झाकलेले चेहरे समोर येतील, असा दावा केला आहे. विजय वडेट्टीवार दावा करताना म्हणाले की, हनी ट्रॅपचे खूप मोठे रॅकेट आहे. त्यात अनेक मोठे मासे अडकले आहेत. साधारण ५० मंत्री आणि अधिकारी यात अडकले आहेत. तसेच मोठे अधिकारी, मंत्री, राजकारणातले अनेक आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपमधे आहेत. ज्याचे नाव पुढे आले, त्या प्रफुल लोढाने व्हिडीओ दाखवून अनेकांकडून पैसे घेतले आहेत. त्याने किमान २०० कोटींची वसुली केली आहे. लोढा हा कुणाचा कार्यकर्ता आहे, हे मी बोलणार नाही. पण या सगळ्या प्रकरणाचा खुलासा लवकर होईल. जे झाकलेले चेहरे आहेत ते समोर येतील, असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.