राजकारणात एन्ट्री घेताच अडचणींचा डोंगर; विजय थलपती यांना CBI चे समन्स, काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली : राजकारणात एन्ट्री घेतलेले आघाडीचे तमिळ अभिनेते विजय यांना सीबीआयने समन्स बजावले आहे. चेंगराचेंगरी प्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे. राजकीय आकांक्षेतून विजय यांनी तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाची स्थापना केली. तमिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याची रणनीती त्या पक्षाने आखली. त्यातून विजय यांनी खूप आधीपासून त्या राज्यात जनसंपर्क आणि प्रचार मोहीम हाती घेतली.
त्या मोहिमेचा भाग म्हणून विजय यांच्या उपस्थितीत टीव्हीकेने सरलेल्या वर्षातील २७ सप्टेंबरला करूरमध्ये मेळाव्याचे आयोजन केले. प्रचंड गर्दी उसळलेल्या त्या मेळाव्यावेळी चेंगराचेंगरी झाली. त्या दुर्घटनेत ४१ जण मृत्युमुखी पडले. संबंधित प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका टीव्हीकेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
त्यावरून न्यायालयाने सीबीआय या केंद्रीय यंत्रणेकडे तपास सोपवला. त्यानंतर सीबीआयने तपास हाती घेत टीव्हीकेच्या काही पदाधिकाऱ्यांची चौकशी केली. आता विजय यांना १२ जानेवारीला पाचारण करण्यात आले आहे. त्यांना सीबीआयच्या दिल्लीतील मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.





