Vijay Thalapathy: तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय थलापती यांनी अभिनयाच्या जोरावर मोठं नाव कमावलं आहे. बालकलाकार म्हणून सुरुवात करून सुपरस्टार होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी मानला जातो. आता त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या पुढील वाटचालीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. २२ जून १९७४ रोजी जन्मलेले विजय यांचं पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. त्यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे प्रसिद्ध दिग्दर्शक असून आई शोभा चंद्रशेखर या गायिका आहेत. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीचं वातावरण मिळालं. त्यांनी बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आणि नंतर ‘नालया थीरपू’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. विजय यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे ६९ चित्रपट केले असून ‘थेरी’, ‘मिन्सारा कन्ना’, ‘बीस्ट’, ‘शाहजहां’ यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. २०२३ साली आलेल्या ‘लिओ’ या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले. त्यांच्या अभिनयाबरोबरच गाण्याची आवडही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. Vijay Thalapathy तथापि, त्यांच्या अनेक चित्रपटांभोवती वादही निर्माण झाले. ‘थलाइवा’ या चित्रपटाच्या टॅगलाइनमुळे राजकीय वाद निर्माण झाला होता, तर ‘सरकार’ चित्रपटावर सरकारी योजनांचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप झाला होता. अलीकडील ‘जन नायकन’ हा चित्रपटही सेन्सॉर आणि न्यायालयीन वादात अडकला होता आणि ऑनलाइन लीक झाल्यामुळे चर्चेत आला. विजय हे तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते एका चित्रपटासाठी ६५ कोटी रुपयांहून अधिक मानधन घेतात, तर त्यांची एकूण संपत्ती ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक चर्चा झाल्या आहेत. त्यांनी २५ ऑगस्ट १९९९ रोजी यूकेमधील त्यांच्या चाहतीशी विवाह केला होता. मात्र, अलीकडे त्यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामागे अभिनेत्री तृषा कृष्णनन यांच्यासोबतच्या कथित संबंधांची चर्चा रंगली आहे. चित्रपटसृष्टीत यश मिळवल्यानंतर विजय यांनी आता राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी ‘तमिळगा वेत्री कळगम’ हा पक्ष स्थापन करून तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवली आहे. आज जाहीर होणाऱ्या निकालांमधून त्यांच्या राजकीय भविष्याचा निर्णय होणार आहे. चित्रपटांप्रमाणेच राजकारणातही ते यशस्वी ठरतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.