पुणे जिल्हा | विजय शिवतारेंनी घेतली थोपटे यांची भेट

भोर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार असं वाटत असताना पुरंदरचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दंड थोपटल्याने बारामती लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २०) शिवसेना नेते (शिंदे गट) विजय शिवतारे यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शरद पवारांचे नाव न घेता जुन्या गोष्टी विसरू नका, बदला घ्यायची हीच वेळ आहे. आता आम्हाला साथ द्या, अशी साद अनंतराव थोपटे यांना घातली आहे. ही लढाई बारामतीच्या पवार घराणेशाहीच्या विरोधात आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री विजय शिवतारे यांनी यावेळी केले.
भोर तालुक्यातील मूळगाव असलेले उत्रौली (ता.भोर) येथील ग्रामदैवत सोनार सिध्द भैरवनाथ देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांची भाऊकी या नात्याने कौटुंबिक भेट घेतली. या प्रसंगी पुरंदरचे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, पै.भूषण शिवतरे, शिवसेना भोर शहराध्यक्ष नितीन सोनावले पदाधिकारी उपस्थित होते.
धडा शिकवण्याची वेळ आली…
शिवतारे पुढे म्हणाले, निवडणूक आहेत म्हणून मी थोपटे यांना भेटण्याकरिता आलो नाही. मी नेहमीच त्यांच्या भेटीला येत असतो. प्रचंड आदरणीय व्यक्तिमत्त्व असून लोकांसाठी धडपड असणारा मावळा म्हणजे अनंतराव थोपटे आहेत. त्यांना भेटल्यानंतर ऊर्जा मिळत असते.
१९९९ ला होणारे मुख्यमंत्री यांना कोणी कटकारस्थान करून पाडले, तर थोपटे यांच्या दोन पिढ्यांचे नुकसान कोणी केले, त्या पवार घराणेशाहीला भोर तालुक्यातील जनतेने धडा शिकवण्याची वेळ आली आहे, अशीही आठवण शिवतारे यांनी यावेळी करून दिली.





