International Emmy Awards 2026: आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांच्या मंचावर विजय सेतुपतींचा जलवा! प्रेझेंटर म्हणून मिळाली मोठी जबाबदारी; दोन भारतीय प्रोजेक्ट्सनाही नामांकन
International Emmy Awards 2026 विजय सेतुपतीला या सोहळ्याचा भाग बनवण्यात निर्माती कविता गुप्ता यांची महत्त्वाची भूमिका होती. कविता गुप्ता या इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेसच्या बोर्ड सदस्य आहेत. यापूर्वी २०२४ मध्ये वीर दास यांना इंटरनॅशनल एमी पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळीही कविता गुप्ता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

International Emmy Awards 2026: आंतरराष्ट्रीय मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स २०२६ च्या मंचावर यंदा भारताची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. अभिनेता विजय सेतुपती याला यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या पुरस्कारांसाठी भारतातील दोन प्रोजेक्ट्सनाही नामांकन मिळाले होते. त्यामुळे या सोहळ्याकडे भारतीय प्रेक्षकांचे लक्ष लागले होते.
विजय सेतुपतीला मिळाली प्रेझेंटरची जबाबदारी
विजय सेतुपती हा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर देशभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या इंटरनॅशनल एमी पुरस्कार सोहळ्यात त्याला प्रेझेंटर म्हणून संधी मिळाली.
विजय सेतुपतीला या सोहळ्याचा भाग बनवण्यात निर्माती कविता गुप्ता यांची महत्त्वाची भूमिका होती. कविता गुप्ता या इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेसच्या बोर्ड सदस्य आहेत. यापूर्वी २०२४ मध्ये वीर दास यांना इंटरनॅशनल एमी पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळीही कविता गुप्ता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
या सोहळ्यात विजय सेतुपती काळ्या रंगाच्या खास पोशाखात दिसला. त्याच्या पोशाखावर खांद्याजवळ आणि कमरेच्या डाव्या बाजूला सोनेरी रंगाची आकर्षक नक्षी होती. हलकी दाढी आणि व्यवस्थित सेट केलेले केस अशा लूकमध्ये त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
View this post on Instagram
दोन भारतीय प्रोजेक्ट्सना नामांकन
यंदाच्या ५४ व्या इंटरनॅशनल एमी पुरस्कारांसाठी भारतातील दोन प्रोजेक्ट्सना नामांकन मिळाले होते. यामध्ये अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास याच्या ‘वीर दास : फुल व्हॉल्यूम’ या कार्यक्रमाचा समावेश होता. या कार्यक्रमाला कॉमेडी या विभागात नामांकन मिळाले होते.
यापूर्वीही वीर दासने आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२१ मध्ये ‘फॉर इंडिया’ आणि २०२३ मध्ये ‘लँडिंग’ या कार्यक्रमांसाठी त्याला नामांकन मिळाले होते. २०२३ मध्ये ‘लँडिंग’ या कार्यक्रमासाठी त्याने पुरस्कारही पटकावला होता. मात्र, यंदा कॉमेडी विभागातील पुरस्कार अर्जेंटिनाच्या ‘डिव्हिजन पालेर्मो सीझन २’ या कार्यक्रमाला मिळाला.
दुसरे भारतीय नामांकन ‘रिअल काश्मीर फुटबॉल क्लब’ या ड्रामा सीरिजला मिळाले होते. या मालिकेत अभिनेता मानव कौल आणि मोहम्मद जीशान अय्यूब यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. फुटबॉलच्या पार्श्वभूमीवर आधारित या मालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय आशयाला ओळख मिळवून दिली.
भारतात कधी पाहता आला पुरस्कार सोहळा?
५४ व्या इंटरनॅशनल एमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन २३ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले होते. मात्र, परदेशातील वेळ आणि भारतातील वेळ यामधील फरकामुळे भारतीय प्रेक्षकांना हा सोहळा २४ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी पाहता येणार होता. दरम्यान, भारतात हा सोहळा कोणत्या टेलिव्हिजन वाहिनीवर किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाणार आहे, याबाबत आयोजकांकडून स्पष्ट माहिती देण्यात आली नव्हती.
याआधीही भारतीयांनी उमटवली आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप
इंटरनॅशनल एमी पुरस्कारांमध्ये भारतीय कलाकार आणि निर्मात्यांनी याआधीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०२० मध्ये ‘दिल्ली क्राइम’ या वेब सीरिजने पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर २०२३ मध्ये वीर दास याने ‘लँडिंग’ या कार्यक्रमासाठी एमी पुरस्कार जिंकला.
विशेष म्हणजे, २०२३ मध्ये निर्माती एकता कपूर यांनाही इंटरनॅशनल एमी डायरेक्टोरेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला चित्रपट निर्मात्या ठरल्या. याआधी २०११ मध्ये सुभाष चंद्रा यांना हा पुरस्कार मिळाला होता. एकूणच, विजय सेतुपतीची प्रेझेंटर म्हणून उपस्थिती आणि भारतीय प्रोजेक्ट्सना मिळालेले नामांकन यामुळे यंदाचा इंटरनॅशनल एमी पुरस्कार सोहळा भारतीय मनोरंजन क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरला आहे.





