गुंतवणुकीचा बादशाह! शेअर बाजार पत्त्यांसारखा कोसळला, पण ‘या’ गुंतवणूकदाराने एकाच दिवसात कमवले 41 कोटी

Share Market News | आज (1 एप्रिल) शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 1200 अंकांनी तर निफ्टी 350 पेक्षा अधिक अंकांनी कोसळला. मात्र, या घसरणीतही दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या सेगमेंटमधील लहान कंपनी अतुल ऑटोचे शेअर्स (Atul Auto Share) तेजीत दिसून आले. आजच्या व्यवहारात कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 16% पर्यंत वाढ झाली. शेअर्स 511.15 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहोचला. यापूर्वी शेअर्सची किंमत 441.40 रुपये होती.
अतुल ऑटो कंपनीने मार्च महिन्यातील त्यांच्या देशांतर्गत विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार, कंपनीच्या विक्रीत वार्षिक 17.5% ची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, इंटर्नल कम्बस्चन इंजिन (IC) असलेल्या तीनचाकी वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाल्यामुळे ही वाढ शक्य झाली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अतुल ऑटोने मार्च 2025 मध्ये देशांतर्गत बाजारात 3391 तीनचाकी वाहनांची विक्री केली, तर मागील वर्षी याच महिन्यात हा आकडा 2886 एवढा होता. या वाढीमध्ये आयसी इंजिन असलेल्या तीनचाकी वाहनांच्या विक्रीत झालेली 34.26% ची वाढ निर्णायक ठरली. मार्च 2024 मध्ये या प्रकारच्या 2017 गाड्या विकल्या गेल्या होत्या, तर यावर्षी ही संख्या 2708 वर पोहोचली.
दरम्यान, कंपनीच्या इलेक्ट्रिक तीनचाकी (L3) वाहनांच्या विक्रीत वार्षिक घट झाली असली तरी इलेक्ट्रिक L5 वाहनांची विक्री वाढली आहे.
विजय केडिया यांची कंपनीत भागीदारी
रिपोर्टनुसार, या कंपनीमध्ये शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांची मोठी भागीदारी आहे. केडिया यांच्याकडे कंपनीचे 50,50,505 शेअर्स आहेत, जे 18.20% हिस्सेदारीच्या बरोबर आहेत. याव्यतिरिक्त, केडिया सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने विजय केडिया यांच्याकडे 7,5,,512 शेअर्स शेअर्स म्हणजेच 2.71% हिस्सेदारी आहे. म्हणजेच केडिया यांच्याकडे कंपनीचे एकूण 5,802,017 शेअर्स आहेत. आजच्या एका दिवसातील तेजीमुळे विजय केडिया यांना सुमारे 41 कोटी रुपयांचा नफा झाला असा अंदाज आहे. गेल्या तीन वर्षांत या शेअरमध्ये 190.95 टक्के वाढ झाली आहे.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





