सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकरला मुंबई संघातून डच्चू!

मुंबई – भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकरसाठी वाईट बातमी आहे. विजय हजारे ट्रॉफी 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यासाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यरची कर्णधारपदी तर पृथ्वी शॉ याची उप-कर्णधार म्हणून निवड झाली आहे. मात्र, मुंबईच्या संघातून सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला डच्चू देण्यात आला आहे. मुंबई संघाकडून वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचं नाव नसल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अर्जुन तेंडुलकर यंदा प्रथमच वरिष्ठ संघात दाखल झाला होता. वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई संघात संधी देण्यात आली. त्याने लीट ई ग्रूप सामन्यातून पदार्पण केलं. दोन षटकांमध्ये केवळ 1 बळी घेता आला होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्यानं केलेली कामगिरी नाराज करणारी होती. मुंबईचाही या सामन्यात पराभव झाला. तसेच विजय हजारे ट्राॅफीच्या सराव सामन्यात अर्जुन तेंडुलकरची कामगिरी फारच खराब झाली असल्यानं त्याला विजय हजारे ट्राॅफीसाठी संधी देण्यात आली नाही अशी एक चर्चा होत आहे.
दरम्यान, अर्जुनने याच वर्षी मुश्ताक अली स्पर्धा खेळली होती. यामध्ये तो पदुच्चेरी आणि हरियाणा या संघांविरुद्ध खेळला होता. याच स्पर्धेत खेळल्यामुळे अर्जुन आगामी 2021 आयपीएलच्या लिलावासाठी पात्र ठरला होता. 18 फेब्रुवारी रोजी आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) 14व्या सीझनसाठी लिलाव करण्यात येणार आहे आणि अर्जुन तेंडूलकरची बेस प्राईझ 20 लाख रूपये आहे. पण, आयपीएलआधी अर्जुन तेंडुलकरला विजय हजारे ट्रॉफीमध्ये संधी न दिल्यानं मोठा धक्का बसला आहे.
मुंबईचा संघ –
श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अखिल हरवाडकर, सूर्यकुमार यादव, सरफराज खान, चिन्मय सुतार, आदित्य तरे, हार्तिक तमोरे, शिवम दुबे, आकाश पारकर, अतिफ अत्तरवाला, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, साइराज पाटील, सुजीत नायक, तनुष कोटियन, प्रशांत सोळंकी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, सिद्धार्थ राऊत, मोहित अवस्थी.





