#VijayHazareTrophy । ऋतुराज पुन्हा चमकला! आसामवर मात करत महाराष्ट्र अंतिम फेरीत

अहमदाबाद – विजय हजारे करंडक ( Vijay Hazare Trophy ) क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राने आसामचा 12 धावांनी पराभव केला व अंतिम फेरी गाठली. आता त्यांची या फेरीत सौराष्ट्रशी लढत होणार आहे. सौराष्ट्रने कर्नाटकचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. या स्पर्धेचा अंतिम सामना येथे येत्या शुक्रवारी होणार आहे. महाराष्ट्राने विजयासाठी दिलेल्या 351 धावांच्या आव्हानाचा जवळपास यशस्वी पाठलाग आसामने केला होता. मात्र, स्वरुपम पुरकायस्थ बाद झाला व आसामला पराभवाचा सामना करावा लागला.
BCCI | निवड समितीच्या अध्यक्षपदाचे कांबळीला स्वप्न, दाखल केलाय अर्ज
आसामच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. शिवशंकर रॉयने 78 व रिषव दासने 53 धावा करत डाव सावरला. हे दोघे बाद झाल्यावर स्वरुपम पुरकायस्थने सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेत घणाघाती फलंदाजी केली. तो खेळपट्टीवर असेपर्यंत महाराष्ट्राचा पराभव होणार असेच चित्र दिसत होते. मात्र, तो 95 धावांवर बाद झाला व त्यानंतर तळातील फलंदाजांनी निराशा केली. महाराष्ट्राने या डावात तब्बल 32 अवांतर धावांची रसद आसामला पुरवली होती. त्यांचा डाव 50 षटकांत 8 बाद 338 धावा असा रोखत महाराष्ट्राने 12 धावांनी विजय मिळवला. महाराष्ट्राच्या राजवर्धन हंगरगेकरने स्वरुपम पुरकायस्थला बाद करत अकूण 4 गडी बाद केले.
BCCI | निवड समितीच्या अध्यक्षपदाचे कांबळीला स्वप्न, दाखल केलाय अर्ज
तत्पूर्वी, आसामचा कर्णधार कुणाल सैकियाने नाणेफेक जिंकत महाराष्ट्राला पहिल्यांदा फलंदाजी दिली. महाराष्ट्राने पुन्हा एकदा त्रिशतकी धावसंख्या उभारली. त्यांनी 50 षटकांत 7 गडी गमावून 350 धावा केल्या. महाराष्ट्राच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. राहुल त्रिपाठी अवघ्या 3 धावांवर परतला. त्यानंतर सलामीवीर ऋतूराज गायकवाडने सत्यजित बच्छावच्या साथित संघाचा डाव सावरला. बच्छाव चांगला खेळत असताना 41 धावांवर बाद झाला. दरम्यान ऋतूराजने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या कर्णधार अंकित बावणेने धडाकेबाज फलंदाजी केली.
या जोडीने द्विशतकी भागीदारी करताना संघाचे त्रिशतक फलकावर लावले. दरम्यान या दोघांनीही आपापली शतके पूर्ण केली. ऋतूराज दीडशतकी खेळी केल्यावर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 168 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 126 चेंडूंचा सामना करताना 18 चौकार व 6 षटकार अशी आतषबाजी केली. अझीम काझी, राजवर्धन हंगरगेकर व कौशल तांबे यांनी साफ निराशा केली. बावणे 89 चेंडूंत 10 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 110 धावा करुन बाद झाला. शमशुझमा काझीने नाबाद 11 धावा करत संघाला 350 धावांचा पल्ला गाठून दिली. आसामकडून मुख्तार हुसेनने 3 गडी बाद केले.
Maharashtra win the Semi-Final 2 against Assam by 12 runs and make it to the Finals of #VijayHazareTrophy 👏
Scorecard – https://t.co/JRfdbj7BBe #MAHvASM #VijayHazareTrophy #SF2 pic.twitter.com/4jVWtymSvV
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 30, 2022
संक्षिप्त धावफलक – महाराष्ट्र – 50 षटकांत 7 बाद 350 धावा. (ऋतूराज गायकवाड 168, अंकित बावणे 110, सत्यजित बच्छाव 41, मुख्तार हुसेन 3-42). आसाम – 50 षटकांत 8 बाद 338 धावा. (स्वरुपम पुरकायस्थ 95, शिवशंकर रॉय 78, रिषव दास 53, अवांतर 32, राजवर्धन हंगरगेकर 4-65).
सौराष्ट्रचा कर्नाटकवर विजय
सौराष्ट्रने दुसऱ्या उपांत्य लढतीत कर्नाटकचा 5 गडी राखून पराभव केला व अंतिम फेरी गाठली. कर्नाटकचा डाव 49.1 षटकांत 171 धावांवर संपूष्टात आला. सौराष्ट्रने 36.2 षटकांत 5 गडी गमावून 172 धावा करत विजय प्राप्त केला.

