Vijay Hazare Trophy 2021 : शॉचे वादळी शतक, मुंबई अंतिम फेरीत

नवी दिल्ली – कर्णधार पृथ्वी शॉ याच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने कर्नाटकविरुद्धच्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिशतकी धावसंख्या उभारली. त्यानंतर गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळे कर्नाटकचा डाव 250 धावांवर संपवताना 72 धावांनी विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरी गाठली. आता या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी त्यांची लढत उत्तर प्रदेशशी येत्या रविवारी होणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना शॉ याच्या वादळी शतकी खेळीमुळे मुंबईने 322 धावा केल्या. त्यात शॉ याने 165 धावांची तडाखेबंद खेळी करताना तब्बल 17 चौकार व 7 षटकार मारले. त्याला शम्स मुलाणी, शिवम दुबे व अमन खान यांनी साथ दिल्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली.
विजयासाठी 323 धावांचा पाठलाग करताना कर्नाटकचा डाव 250 धावांवर संपुष्टात आला. त्यांचा आक्रमक फलंदाज देवदत्त पडीक्कलने देखील घणाघाती फलंदाजी केली. मात्र, तो बाद झाल्यावर शरथ बीआर वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला मुंबईच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना करता आला नाही. त्यांचा डाव 43 व्या षटकांत 250 धावांवर संपला व मुंबईने 72 धावांनी हा सामना जिंकत दिमाखात अंतिम फेरी गाठली. या फेरीत त्यांची लढत उत्तर प्रदेशशी होणार आहे.
उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेशने गुजरातचा 5 गडी राखून पराभव केला व अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. गुजरातचा डाव 184 धावांवर गुंडाळताना उत्तर प्रदेशने 43 व्या षटकांत 5 बाद 188 धावा करत विजय मिळवला.





