निष्कलंक राजकारणाची विजय यांनी दिली ग्वाही

कोईम्बतूर : तमिळनाडूतील आघाडीचे अभिनेते विजय यांनी निष्कलंक राजकारण करण्याची ग्वाही दिली. राजकारणात लबाडीला थारा नाही आणि माझ्याकडून मिळणारही नाही, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली. राजकारणात सक्रिय झालेल्या विजय यांनी तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाची स्थापना केली आहे. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी टीव्हीके सज्ज होत आहे.
अशात विजय यांनी शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, राजकारणात अनेक आले आणि गेले. काहींनी खोटी आश्वासने देऊन, जनतेला फसवून सत्ता मिळवली. ती कथा आता जुनी झाली. त्या कथेची पुनरावृत्ती होणार नाही. आम्ही ती होऊ देणार नाही. निष्कलंक राजकारण करण्यावर टीव्हीकेचा विश्वास आहे. आमचा पक्ष जनकल्याणासाठी झटेल.
कार्यकर्त्यांनी जनतेच्या संपर्कात राहून त्यांचा विश्वास प्राप्त करावा. मैदान तयार आहे. प्रामाणिकपणे, समर्पित वृत्तीने कार्य करा. रिंगणात उडी घ्या. आपला विजय निश्चित आहे, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. विजय यांनी तूर्त तरी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या पक्षामुळे आगामी निवडणूक आणखी रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.





