पुणे शहरात सतर्कतेचा आदेश जारी; समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास कारवाई

पुणे – मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तर, लोकप्रतिनिधींच्या निवासस्थान परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राज्यभरासह मंगळवारी शहरातील नवले पूल परिसरातही आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड, तसेच ग्रामीण भागात बंदोबस्त वाढवण्यात आला. मंत्री, आमदार आणि खासदारांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. समाजमाध्यमातून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. शहर आणि जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या सुमारे 200 ठिकाणी पोलिसांनी नजर ठेवली आहे.
“आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महामार्गांवर देखील गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. आंदोलकांना आवाहन आहे की, त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून प्रशासनाला सहकार्य करावे.”- रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर
सर्व महामार्गांवर अतिरिक्त बंदोबस्त
नवले पूल हा मुंबई-बंगलोर महामार्गावर आहे. येथून दररोज हजारो वाहने जातात. त्याचठिकाणी आंदोलन झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या पुणे-सातारा, पुणे-मुंबई, पुणे- नगर आणि पुणे-सोलापूर अशा चार मार्गांवर अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.





