Vidya Balan: ना पार्टी, ना झगमग; विद्या बालनने साधेपणाने पॅपराझींंसोबत केला वाढदिवस साजरा

Vidya Balan: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्री विद्या बालन हिने आपला ४७वा वाढदिवस अतिशय साध्या आणि वेगळ्या अंदाजात साजरा केला. कोणतीही मोठी पार्टी किंवा भव्य सोहळा न करता विद्या हिने थेट पॅपराझींंसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.
या वेळी विद्या काळ्या रंगाच्या एलिगंट पोशाखात दिसली. केक कापताना उपस्थित असलेल्या सर्वांचे तिने मनापासून आभार मानले. टाळ्या, शुभेच्छा आणि हास्याच्या वातावरणात विद्या अत्यंत आनंदी दिसत होती. पॅपराझींसाठी तिने मनमोकळेपणाने पोजही दिल्या.
विद्या बालनचा प्रेरणादायी चित्रपट प्रवास
विद्या बालनचा सिनेसफर तिच्या व्यक्तिमत्त्वाइतकाच खास आहे. २००५ साली ‘परिणीता’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत तिने पहिल्याच भूमिकेतून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर ‘कहानी’, ‘पा’, ‘तुम्हारी सुलु’, ‘भूल भुलैया’ आणि ‘द डर्टी पिक्चर’ यांसारख्या चित्रपटांतून तिने सशक्त महिला पात्रांची नवी व्याख्या मांडली.
View this post on Instagram
२०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’मधील सिल्क स्मिता प्रेरित भूमिकेसाठी विद्या बालनला विशेष ओळख मिळाली. निडर, आत्मविश्वासू आणि बेधडक स्त्रीचे प्रभावी चित्रण केल्याबद्दल तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला.
वैयक्तिक आयुष्य आणि सन्मान
विद्या बालनने २०१२ साली सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याशी विवाह केला. २०१४ मध्ये तिच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. अलीकडेच ती ‘भूल भुलैया ३’ मध्ये तिच्या लोकप्रिय मंजुलिका या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अभिनयाची ताकद यांचा संगम असलेल्या विद्या बालनने पुन्हा एकदा दाखवून दिले की खरा स्टारडम झगमगाटात नाही, तर माणुसकीत असतो.





