विधानपरिषदेच्या ४ जागा बिनविरोध, नागपुरातील जागेवर निवडणूक का? पटोलेंनी सांगितलं कारण…

पुणे – राज्यात ६ जागांसाठी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकांमधील ४ जागांसाठी भाजप, काँग्रेस व शिवसेना पक्षांमध्ये समझोता झाला आहे. मात्र उर्वरित दोन जागांसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस व भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार असल्याचे आज स्पष्ट झाले. विधानपरिषद निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची आज (शुक्रवार) शेवटची मुदत होती. दुपारी तीनपर्यंत नागपूर व अकोला-वाशीम-बुलडाणा येथील जागेसाठी दाखल केलेली उमेदवारी भाजप, शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी मागे न घेतल्याने येथे अनुक्रमे भाजप-काँग्रेस व भाजप-शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार आणि मुंबई येथील जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार आहे. कोल्हापूरातील एक जागा काँग्रेसला, धुळे-नंदुरबार येथील एक जागा भाजपला तर मुंबईतल्या २ जागा शिवसेना व भाजप प्रत्येकी एक असे बिनविरोध निवडणुकीचे चित्र असेल. नागपुर, अकोला-वाशीम-बुलडाणा येथे मात्र सामना पाहायला भेटेल.
बावनकुळेंना संधी दिल्याने नागपूर विधानपरिषद चर्चेत
२०१९ विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी नाकारली होती. बावनकुळेंना तिकीट नाकारल्याने नागपुरात भाजपचे नुकसान झाले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अशातच आता पक्षाने नागपूर विधानपरिषद निवडणुकीसाठी बावनकुळेंना संधी दिली आहे. विनोद तावडेंना पक्ष संघटनेत दिलेली जबाबदारी व बावनकुळेंना विधानपरिषदेची संधी यामुळे केंद्रातील भाजप नेतृत्व राज्यातील भाजपचा चेहरा बदलण्याच्या मनस्थितीत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत.
नाना पाटोले म्हणतात…
६ जागांपैकी ४ जागांवर निवडणूक बिनविरोध होत असताना नागपुरातील जागेसाठी निवडणूक का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विचारला असता त्यांनी, “अर्ज परत घेण्याची मुदत संपली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयरच विजयी होतील. नागपूरसाठीचा कोणताही प्रस्ताव भाजपाकडून आला नाही. त्यामुळे नागपूरचा निर्णय झालेला नाही” असं सांगत चेंडू भाजपकडे टोलवला.





