विधानसभेच्या तोंडावर ‘हा’ नेता शिंदे पिता-पुत्राची साथ सोडून ठाकरेंकडे जाणार

डोंबिवली : सध्या राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. सगळेच पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना मोठा धक्का बसणार आहे. शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर एक नेता एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंसोबत होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर या नेत्याने मोठा निर्णय घेतला असून त्याला धक्का शिंदेंच्या शिवसेनेला तसेच भाजपालाही बसण्याची शक्यता आहे.
‘हा’ नेता सोडणार शिंदे पिता-पुत्राची साथ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेचे निकटवर्तीय असलेले शिंदेंच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दीपेश म्हात्रेंसोबत कल्याण-डोंबिवली महापालिकेमधील चार माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
कधी करणार ठाकरे गटात प्रवेश?
6 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी दीपेश म्हात्रे तयारी करत असून ते इच्छुक उमेदवार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना डोंबिवलीतून उमेदवारी मिळते का? हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे.





