Vidhan Parishad Election 2024 : राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज 12 जुलै रोजी होणार्या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार दिल्याने आता ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर मतांची जुळवाजुळव करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हान दोन्हीकडच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, दुपारी 1.30 वाजेपर्यंत एकूण 246 आमदारांचं मतदान झालं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी विशेष खबरदारी घेतली असून आपल्या आमदारांची गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच खातरदारी केल्याचं पाहायला मिळालं आहे. भाजप आणि अपक्ष मिळून 108 आमदारांचे मतदान झाले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 40 आणि दोन अपक्ष अशा एकूण 42 आमदार यांनी मतदान केलं. तर, शिंदे गटाचे एकूण 38 आमदार असून त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांचे 2 अशा 9 आमदारांचं समर्थन असल्यानं त्यांचे संख्याबळ 47 होते. शिंदेंच्याही सर्व आमदारांचे मतदान पूर्ण झालं आहे. दरम्यान, मनसेचे राजु पाटील व बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे मतदान शिल्लक आहे. काँग्रेसच्या सर्व 37 आमदारांनी आज मतदान केले. तसेच, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. ‘हे’ उमेदवार आहेत रिंगणात : भाजप : पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर शिंदे गट : भावना गवळी, कृपाल तुमाने अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे काँग्रेस : प्रज्ञा सातव उद्धव ठाकरे गट : मिलिंद नार्वेकर शरद पवार गट : जयंत पाटील