#व्हिडीओ: उमा भारतींनी मद्यविक्रीच्या दुकानात जाऊन केली तोडफोड; मद्यविक्री विरोधात उतरल्या रस्त्यावर

भोपाळ : मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी राज्यात दारूबंदी मोहीम सुरू केली आहे. उमा भारती यांनी रविवारी अचानक दारूच्या दुकानात घुसून तोडफोड केली आहे. त्यांनी दगडफेक करून दारूच्या बाटल्या फोडल्या आहेत. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
उमा भारती यांनी या विषयीचे एक ट्विट केले आहे. उमा भारती यांनी यात एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यांच्या सोबत समर्थकही त्यांच्या सोबत असून तेथे घोषणाबाजी करताना दिसले.
1) बरखेड़ा पठानी आझाद नगर, बीएचईएल भोपाल , यहाँ मज़दूरों की बस्ती में शराब की दुकानों की शृंखला हैं जो की एक बड़े आहाता में लोगों को शराब परोसते हैं । pic.twitter.com/dNAXrh1jRY
— Uma Bharti (@umasribharti) March 13, 2022
भोपाळमधील भेल भागातील आझाद नगरमध्ये ही तोडफोड करण्यात आली आहे. या भागात कामगारांच्या वस्त्या आहेत, जवळच मंदिरे आहेत, लहान मुलांसाठी शाळा आहेत. जेव्हा मुली आणि महिला गच्चीवर उभ्या असतात तेव्हा मद्यधुंद पुरुष त्यांच्याकडे चेहरा करुन लघवी करण्यासाठी उभे राहतात, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. प्रशासनाने प्रत्येक वेळी बंदीचे आश्वासन दिले होते, पण अनेक वर्षांपासून ते केले जात नाही. आज मी प्रशासनाला आठवडाभरात दुकान व परिसर बंद करण्याचा इशारा दिला आहे, असेही उमा भारती म्हणाल्या.
मद्याच्या धोरणात हे स्पष्ट आहे की, कोणत्याही भागातील लोकांना दारूचे दुकान नको असेल तर तिथे परवानगी देता येणार नाही, असे उमा भारती म्हणाल्या मध्य प्रदेश सरकारच्या हेरिटेज मद्य धोरणाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी नवीन दारू धोरणाची गरज असल्याचे सांगितले.
या वर्षी जानेवारी महिन्यात शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाने २०२२-२३ या वर्षासाठी नवीन मद्य धोरणाला मंजुरी दिली होती. यानुसार विदेशी मद्य स्वस्त होणार आहे. सरकारने विदेशी मद्यावरील अबकारी शुल्क १० वरून १३ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मद्याची मागणी वाढेल आणि विक्री अधिक होईल. तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी गेल्या वर्षी १५ जानेवारी २०२२ पर्यंत दारू बंदी होईल अन्यथा रस्त्यावर उतरू असे म्हटले होते. मात्र तारीख संपल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी दारूबंदी तर दूरच, शिवराज मंत्रिमंडळाने नवीन मद्य धोरण जाहीर केले होते.




