VIDEO : रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये पायात बूट घालून धुतले जातात बटाटे, पाहा किळसवाणा प्रकार

लखनऊ – प्रत्येक रुग्णालयात स्वच्छता आणि निरोगी आहार असणे आवश्यक असते. त्यानुसार रुग्णाची काळजी घेतली जाते. मात्र काही रुग्णालयात अस्वच्छता असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले. असाच एका रुग्णालयातील किळसवाणा प्रकार समोर आला आहे. रायबरेलीतील एम्स या सरकारी रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये भाजी बनवण्यासाठी वापरले जाणारे बटाटे चक्क पायात बूट घालून धुतले जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओत रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये एक व्यक्ती पायात बूट घालून बटाटे धुवत असल्याचे दिसते. तर दुसरी व्यक्ती पायात बूट घालून एका मोठ्या भांड्यात उभा राहून बटाटे धुवत आहे. या धुतलेल्या बटाट्यापासूनचं रुग्णालयातील रुग्ण आणि परिचारिकांसाठी भाजी बनवली जाते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला. तसेच एम्स प्रशासनाच्या मीडिया सेलने कारवाई करण्याऐवजी त्रुटींवर पांघरूण घातले.
यावर एम्सचे मीडिया पीआर प्रभारी डॉ. शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “व्हायरल व्हिडिओ जुना आहे. त्यात दिसणाऱ्या कर्मचाऱ्याला 15 दिवसांपूर्वी काढून टाकण्यात आले होते. एम्स प्रशासनाची बदनामी करण्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने या कर्मचाऱ्याने व्हिडिओ बनवून व्हायरल केला होता.”
एम्स रायबरेली में जूतों से कुचले जा रहे आलू pic.twitter.com/7RT8FT27Qe
— alkesh kushwaha (@alkesh_kushwaha) April 7, 2023
दरम्यान, घडलेली घटना अतिशय धक्कादायक असून रुग्णालयातच लोकांच्या आरोग्यासोबत खेळले जात असल्याचे समोर येते. यावरून रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. यासारखे प्रकार थांबविण्यासाठी आता तरी आरोग्य विभाग काही ठोस निर्णय घेणार का? हे पाहावे लागणार आहे.





