Inflation: कांदे, बटाटे, भाजीपाला महागला; घाऊक महागाई 13 महिन्याच्या उच्चांकावर

Wholesale inflation – इतर क्षेत्रातील वस्तूंच्या किमती काही प्रमाणात कमी होत असल्यास तरी अन्नधान्याच्या आणि भाजीपाल्याच्या किमती कमी होत नाहीत. या कारणामुळे घाऊक मागाई एप्रिल महिन्यात वाढून 1.26 टक्क्यावर गेली आहे. हा 13 महिन्याचा उच्चांक आहे. पुढील महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे. मात्र या आकडेवारीमुळे रिझर्व बँक या पतधोरणात व्याजदर कपातीच्या शक्यतेवर विचार करणार नाही असे गृहीत धरले जात आहे.
एप्रिल महिन्यात बटाट्यांच्या किमती 71 टक्क्यांनी वाढल्या आहेत तर कांद्याच्या किमती 59 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर भाजीपाल्याच्या किमती 23 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे इतर वस्तूंच्या किमती कमी झाल्या असल्या तरी या नकारात्मक आकडेवारीचा परिणाम एकूण महागाईवर झाला असल्याचे दिसून येते.
गेल्या दोन महिन्यापासून घाऊक महागाई वाढत आहे. फेब्रुवारीमध्ये या महागाईचा दर 0.20 टक्के तर मार्चमध्ये 0.53% होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात घाऊक महागाइचा दर 0.19 टक्के होता. या आकडेवारी बद्दल वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की अन्नधान्याच्या आणि भाजीपाल्याच्या किमती बरोबरच कच्चे पेट्रोलियम, नैसर्गिक वायू इत्यादींच्या किमती वाढल्यामुळे एकूण महागाई वाढली.
या आकडेवारी बद्दल बोलताना ईक्रा या संस्थेच्या मुख्य अर्थतज्ञ आदिती नायर यांनी सांगितले की, घाऊक महागाईचा संबंध जागतिक पातळीवरील वस्तूंच्या किमतीशी असतो. जागतिक बाजारात सध्या महागाई जास्त आहे. त्यातल्या त्यात खनिज तेलाच्या किमती जास्त पातळीवर आहेत. त्यामुळे घाऊक महागई वाढली आहे.
मात्र किरकोळ किमतीवर आधारित महागाई काही प्रमाणात कमी झाल्याची आकडेवारी परवा जाहीर झाली होती. रिझर्व बँक व्याजदर ठरविताना किरकोळ किमतीवरील आधारित महागायचा विचार करते. मात्र किरकोळ किमतीवर आधारित महागाई चार टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे आगामी पत धोरणात रिझर्व बँक व्याजदर कपातीच्या शक्यतेवर विचार करणार नाही. जागतिक बाजारात अस्थिरता आहे. त्याचाही परिणाम महागाईवर होत आहे असे विश्लेषकांनी सांगितले





