स्मार्ट सिटीने लॉंच केले “पुणे टेलिमेडिसीन अॅप’

विलगीकरणातील व्यक्तींसाठी ‘व्हिडिओ ओपीडी’ : घरबसल्या घेता येणार वैद्यकीय सल्ला
पुणे – सौम्य लक्षणे असलेल्या करोनाबाधित व्यक्तींचे मार्गदर्शक सूचनांनुसार गृह विलगीकरण करून त्यांना घरीच उपचार देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यांना आरोग्यविषयक कोणतीही शंका असल्यास किंवा वैद्यकीय सल्ला हवा असल्यास आता तज्ज्ञ डॉक्टरांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधून शकतात. पुणे स्मार्ट सिटीने रुग्णालय व्यवस्थापन एकात्मिक प्रणाली (एचएमआयएस) अंतर्गत “पुणे टेलिमेडिसीन- आरोग्य धीर‘ हे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे.
डॉक्टरांशी संवाद साधल्यानंतर आपल्या सर्व वैद्यकीय नोंदी, डॉक्टरांची टिप्पणी आणि अहवाल ऍपवर एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे. करोनाबाधित प्रत्यक्ष बाहेर जावे लागू नये यासाठी एक प्रकारे दृकश्राव्य स्वरुपातील ही व्हिडिओ ओपीडी सुविधा उपलब्ध झाली आहे. शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) पाळून नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीने हा उपक्रम सुरू केला आहे.
या पथदर्शी उपक्रमाची महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
स्मार्ट सिटी मिशनंतर्गत रुग्णालय व्यवस्थापन एकात्मिक प्रणाली या एका महत्त्वाच्या प्रकल्प पुणे स्मार्ट सिटीने पुढाकार घेतला आहे. सर्व प्रकारच्या आरोग्य सेवांशी नागरिकांना जोडणे हा यामागील उद्देश आहे. या प्रकल्पांतर्गत हे ऍप विकसित केले असून, करोनाच्या अनुषंगाने आरोग्यविषयक सुविधा कोणत्या आहेत याबाबतची माहिती येथे उपलब्ध करण्यात येणार आहे.
सर्वसामान्यांसाठी सुलभ आणि उपयुक्त असे हे मोबाइल अॅप आहे. यामुळे आरोग्य सुविधेत भर पडणार असून, शहरातील करोना संकटाला तोंड देताना, तसेच संसर्ग रोखण्यासाठी हे मोबाइल ऍप साह्यभूत ठरणार असल्याचे मोहोळ म्हणाले.
करोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन सध्या बाधितांसाठी सेवा देण्यावर भर आहे. तसेच, पुढील काळात याची व्याप्ती वाढवून लवकरच इतर रुग्णांसाठीही अनेक सेवा उपलब्ध केल्या जातील. डॉक्टरांची वेळ घेणे, सल्ला घेणे यासह विविध सेवा घरबसल्या या मोबाइल ऍपवरून देण्यात येणार असल्याचे अग्रवाल म्हणाल्या.
विविध सेवा सुविधांचे पर्याय…
https://tinyurl.com/y4hahkue या लिंकवर जाऊन किंवा क्यूआर कोड स्कॅन करून पुणेकर नागरिकांनी प्ले स्टोअरमधून “पुणे टेलिमेडिसीन-आरोग्य धीर’ हे अॅप डाऊनलोड करावे. यामध्ये विविध सेवा सुविधांचे पर्याय देण्यात आले आहेत. आपणास आवश्यक असणाऱ्या सुविधेचा पर्याय निवडून संबंधित आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





