VIDEO: करिश्मा आणि सोनालीने जुन्या आठवणींना दिला उजाळा; ‘म्हारे हिवडा में नाचे मोर’ गाण्यावर धरला ठेका

मुंबई – सोनाली बेंद्रे आणि करिश्मा कपूर 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र या दोन्ही अभिनेत्री सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहेत. सोनाली आणि करिश्मा 1999 साली प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात एकत्र दिसल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आजही या चित्रपटाची आणि त्यातील गाण्याची क्रेझ कायम आहे.
नुकतेच सोनाली आणि करिश्मा ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ च्या शोमध्ये उपस्थित राहिल्या होत्या. यादरम्यान त्यांनी 90 च्या दशकातील जुन्या आठवणींना उजाळा देत ‘म्हारे हिवडा में नाचे मोर’ या आयकॉनिक गाण्यावर ठेका धरला. याचा व्हिडिओ सोनालीने इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात दोघी सुंदर डान्स करताना दिसत आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सोनालीने “याचा रिमेक करायचा होता… जी जुन्या सोनेरी दिवसांची एक आठवण करून देणारा !”, असे कॅप्शन दिले आहे.
हा व्हिडिओ पाहून अभिनेत्री तब्बूने स्मायली इमोजीसह कमेंट करत या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. तर नीलम कोठारीने ‘आनंदी आठवणी’ असे लिहिले आहे. या चित्रपटात मोहनीश बहल, तब्बू, सलमान खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर, सोनाली बेंद्रे आणि इतर दिग्गज कलाकार होते.
View this post on Instagram
सध्या सोनाली बेंद्रे ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकांच्या भूमिकेत दिसत आहे. तर करिश्मा लवकरच ‘ब्राउन: द फर्स्ट केस” या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित वेब सीरिजमध्ये एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे.





