#Video : “गौतमी पाटीलला पाठिंबा देणं गरजेचं…’; तृप्ती देसाईंनी केलेलं वक्तव्य चर्चेत

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी,मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते.
सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल आहे. तर दुसरीकडे गौतमीवर टीकाही केली जाते तिचा कार्यक्रमावर बंदी घाला अशी मागणीही समाजातील काही लोकांकडून केली जात आहे. दरम्यान, या सगळ्यात आता गौतमीला पाठिंबा दिला पाहिजे असं वक्तव्य भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी केलं आहे. एका मुलाखती दरम्यान तृप्ती देसाईंनी हे वक्तव्य केलं असून, सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अनेकांनी गौतमीच्या डान्सवरही आक्षेप घेतला होता. गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच इंदुरीकर महाराजांनीही गौतमी पाटीलबाबत वक्तव्य केलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर आता तृप्ती देसाईंनी केलीली प्रतिक्रिया चर्चेत येत आहे.
या मुलाखतीत त्यांना गौतमी पाटीलबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत त्या म्हणाल्या, “गौतमी पाटील सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी आहे. तिला पाठिंबा देणं गरजेचं आहे. राजकीय नेते, इंदुरीकर महाराज जेव्हा तिला विरोध करतात, तेव्हा सर्वसामान्य जनता तिच्यामागे उभी राहते. कारण ती एका गरीब घरातून आलेली आहे. पण महिला म्हणून तिला पाठिंबा देणं गरजेचं आहे.’ असं तृप्ती देसाई यावेळी म्हणल्या आहेत.





