विकी कौशल ‘या’ चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकणार होता, पण ऑडिशनमध्ये नाकारले

मुंबई – बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता विकी कौशलने अल्पावधीतच सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. मात्र विकी बॉलीवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानचा मोठा चाहता आहे. विकीने याचा अनेकदा खुलासाही केला आहे. एका चित्रपटात हे दोघे एकत्र कामही करणार होते. मात्र ऑडिशनदरम्यान त्याला रिजेक्ट करण्यात आल्याचा खुलासा अभिनेता शारिब हाश्मीने एका मुलाखतीत केला आहे.
विकी कौशलने यशराजच्या ‘जब तक है जान’मध्ये किंग खानसोबत काम करण्यासाठी ऑडिशन दिले होते. पण तो रिजेक्ट झाला होता. शारीब हाश्मीने सांगितले की, ‘विक्कीने या चित्रपटातील शाहरुखच्या मित्राच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते, परंतु निर्मात्यांना या भूमिकेसाठी तो अजिबात आवडला नाही. त्यामुळेच तो नाकारला गेला.यानंतर मला ही भूमिका मिळाली आणि मी होकार दिला.
दरम्यान, विक्की कौशलने 2012 साली अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. नुकताच विकीचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यात त्याच्यासोबत मुख्यभूमिकेत सारा आली खान आहे. त्यानंतर आता विकी लवकरच मेघना गुलजारच्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटात दिसणार आहे.





