चाकण : शासनाकडून पशूसंवर्धन विभागात लागू करण्यात येत असलेल्या आधाराधारित बायोमेट्रिक हजेरी प्रणालीविरोधात राज्यातील पशूवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशूवैद्यक संघटना आणि पशूचिकित्सा व्यवसायी संघटनांनी संयुक्तपणे या प्रणालीला तीव्र विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. पशूसंवर्धन विभागाचे कामकाज प्रामुख्याने क्षेत्रीय स्वरूपाचे असून अधिकारी व कर्मचार्यांना दुर्गम भाग, वाडी-वस्ती तसेच ग्रामीण भागात जाऊन सेवा द्यावी लागते. अशा परिस्थितीत भ्रमणध्वनीआधारित किंवा बायोमेट्रिक हजेरी सक्ती करणे व्यवहार्य नसल्याचा दावा संघटनांनी केला आहे. ग्रामीण आणि डोंगराळ भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने हजेरी नोंदविताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचेही संघटनांनी नमूद केले. पशूवैद्यकीय सेवा अनेकदा आपत्कालीन स्वरूपाच्या असतात. त्यामुळे हजेरीच्या तांत्रिक प्रक्रियेमुळे सेवेमध्ये विलंब होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. तसेच कर्मचार्यांवर वैयक्तिक भ्रमणध्वनीद्वारे हजेरीची सक्ती करणे अन्यायकारक असल्याचे सांगत विभागातील प्रत्यक्ष कामकाज आणि व्यावहारिक अडचणी लक्षात घेऊन ही प्रणाली तातडीने स्थगित करावी, अशी मागणी करण्यात आली. कर्मचार्यांच्या हिताविरुद्ध आणि अव्यवहार्य निर्णय जबरदस्तीने लागू करण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे. दोन्ही संघटनांच्या वतीने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉ. राजेश कुमार वासनिक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पशूचिकित्सा व्यवसायी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष डॉ. सतीश देशमुख, पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश शेळके पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ. संदीप चौधरी, महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशूवैद्यक संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश शिंदे, डॉ. दत्तात्रेय बेदरे, डॉ. सुरेश कड, डॉ. भोर, डॉ. रहाणे, डॉ. शैलजा खोब्रागडे आदी अधिकारी उपस्थित होते. कर्मचार्यांच्या व्यावहारिक अडचणी लक्षात घेऊन शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. -डॉ. महेश शेळके, डॉ. ऋषिकेश शिंदे हेही वाचा : Pune District : खेड पंचायत समितीबाहेर आंदोलन; आरटीई प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी