ज्येष्ठ पत्रकार जोसेफ पिंटो यांचे 72 व्या वर्षी पुण्यात निधन

पुणे – ज्येष्ठ पत्रकार जोसेफ पिंटो यांचे अल्पशा आजाराने शनिवारी पहाटे पुण्यात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन भाऊ व बहीण, तसेच पत्नी व कन्या, जावई असा परिवार आहे. दीपक फर्टिलायझर्समध्ये काही काळ वरिष्ठ पदावर नोकरी केल्यानंतर पिंटो यांनी वृत्तपत्र क्षेत्रात आपला ठसा उमटविला.
सुरुवातीला “संडे ऑब्झर्व्हर’ या दैनिकात काम केल्यानंतर त्यांनी गोमंतक टाइम्स व महाराष्ट्र हेरॉल्ड या दैनिकांमध्ये मुख्य संपादक म्हणून काम केले. शिवाय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागासह (रानडे इन्स्टिट्यूट), सिंबायोसिस महाविद्यालय, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, नानासाहेब परुळेकर महाविद्यालय इत्यादी अनेक वृत्तपत्र विद्या महाविद्यालयांमध्ये शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. पिंटो यांनी स्वतःच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच “लोकविज्ञान संघटना’ या संस्थेमार्फत सामाजिक कार्य केले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.





