ज्येष्ठ उद्योजक मधुर बजाज यांचे निधन

मुंबई – बजाज ऑटो कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक मधुर बजाज यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते 63 वर्षाचे होते. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बजाज यांना ब्रिच कँडी इस्पितळात काही दिवसापूर्वी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. शुक्रवारी सकाळी पाच वाजता त्यांचे निधन झाले.
दरम्यान त्यांच्या निधनाबद्दल उद्योग क्षेत्रात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. भारत फोर्ज समूहाचे प्रमुख बाबा कल्याणी यांनी मधुर बजाज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. कल्याणी यांनी म्हटले आहे की, मधुर बजाज हे आमचे कौटुंबिक मित्र होते. भारतीय उद्योग महासंघाच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चरचे ते अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मनुफॅक्चरर्सच्या कामकाजामध्ये रस दाखविला होता. वाहन क्षेत्रामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले असल्याचे कल्याणी यांनी सांगितले.
महाराष्ट्र स्कूटर लिमिटेडचे अध्यक्ष होते. बजाज उद्योगसमूहातल्या इतर कंपन्यांमधेही ते संचालकपदावर होते. प्रसिद्ध उद्योगपती जमनालाल बजाज यांचे ते नातू होते तर रामकृष्ण बजाज यांचे पुत्र होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी बजाज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली.





