Asha Singh Jaiswal : मनोरंजन विश्वावर शोककळा ! ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन; महाभारत मालिकेत साकारली होती खास भूमिका
भारतीय टेलिव्हिजनच्या सुवर्णकाळाला आपल्या अभिनयाने समृद्ध करणाऱ्या एका ज्येष्ठ आणि गुणी कलाकाराने (Asha Singh Jaiswal) जगाचा निरोप घेतला आहे.

Asha Singh Jaiswal : भारतीय टेलिव्हिजनच्या सुवर्णकाळाला आपल्या अभिनयाने समृद्ध करणाऱ्या एका ज्येष्ठ आणि गुणी कलाकाराने (Asha Singh Jaiswal) जगाचा निरोप घेतला आहे. बी. आर. चोप्रा यांच्या अजरामर ठरलेल्या ‘महाभारत’ मालिकेत द्रोणाचार्यांची पत्नी आणि अश्वत्थामाची आई म्हणजेच ‘कृपी’ ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह जयसवाल यांचे दुःखद निधन झाले.
22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या काही काळापासून (Asha Singh Jaiswal) प्रदीर्घ आजाराशी झुंज देत होत्या. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आशा सिंह जयसवाल यांच्या निधनाची माहिती त्यांचे सुपुत्र आकाश सिंह यांनी एका भावनिक सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली.
आईच्या जाण्याने कोसळलेल्या दुःखात त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची आणि जीवनप्रवासाची आठवण जागवली. 1970 च्या दशकात अभिनय विश्वात पाऊल ठेवणाऱ्या आशा सिंह यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले, पण ‘महाभारत’मधील कृपीच्या भूमिकेने त्यांना देशभरातील घराघरात अफाट लोकप्रियता मिळवून दिली.
अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी (Asha Singh Jaiswal) कलाविश्वात स्वतःचा एक वेगळा मार्ग निर्माण केला होता. त्या भारताच्या पहिल्या महिला मिमिक्री आर्टिस्टपैकी एक होत्या. ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्याच्या त्यांच्या अद्भुत कौशल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी थक्क झाली होती.
केवळ कलाकारच नव्हे, तर समाजसेविका आणि ‘आशा इव्हेंट्स अँड फिल्म्स’च्या संस्थापिका म्हणूनही त्यांनी (Asha Singh Jaiswal) स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण हिंदी मनोरंजन विश्वावर आणि कलाप्रेमींवर शोककळा पसरली आहे.






