ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे पुण्यात निधन; तेजस्विनी पंडितसह कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

Veteran actress Jyoti Chandekar passes away: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. त्या 68 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. त्यातील अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यादरम्यान त्यांची दुपारी चार वाजता प्राणज्योत मालविली. चांदेकर यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चांदेकर यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त होत आहे.
चांदेकर यांच्या गुडघ्यावर 2019 मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यातून बाहेर पडल्यावर त्यांनी पुन्हा मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. ‘रखेली’ हे त्यांचे गाजलेले नाटक होते. त्यासोबतच त्यांनी ‘मादी’, ‘जंगली कबुतर’, ‘राजकारण गेले चुलीत’, ‘मिसेस आमदार सौभाग्यवती’ अशा विविध नाटकांमधून भूमिका केल्या. तर, ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘पाऊलवाट’, ‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा सिनेमांमधून त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या होत्या. ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या होत्या.
पुरस्कारांनी सन्मानित
अभिनय क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून पुणे नाटय़परिषदेतर्फे त्यांना ‘जीवनगौरव’ देण्यात आला होता. तसेच ‘मी सिंधूताई सपकाळ’ या चित्रपटासाठी त्यांना ‘झी गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.





