Pimpri : वेताळ महाराज उद्यान समस्यांच्या गर्तेत

सांगवी : जुनी सांगवीतील वेताळ महाराज उद्यान समस्यांच्या गर्तेत अडकले आहेत. सर्वत्र कचरा आणि तो ही पावसाने कुजलेला. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव अशा समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. यात पोलिसांच्या व्हॅनचे केबिन गेल्या अनेक दिवसांपासून पदपथावर पडून आहे. संपूर्ण पदपथ रोखलेल्या या केबिनमुळे देखील पाणी साचणे, डासांचा प्रादुर्भाव वाढणे अशा समस्यांना सांगवीकरांना तोंड द्यावे लागत आहे.
जुनी सांगवीतील वेताळ महाराज उद्याना समोरील पदपथावर गेल्या कित्येक वर्षांपासून जाळीची पोलीस गाडी पडून आहे. परिणामी नागरिकांना पदपथ वापरता येत नाही. त्यामुळे ही जाळीची गाडी उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच वेताळ महाराज उद्यान समस्यांच्या गर्तेत अडकले आहे.
वेताळ महाराज उद्यानाजवळ असलेल्या गणपती विसर्जन घाटानजिक नियमित गर्दी असते. तसेच उद्यानात येणाऱ्या छोट्या मुलांची, नागरिकांचीही वर्दळ असते. सांगवीतून दापोडीकडे ये जा करण्यासाठी वाहनचालक येथील रस्त्याचा वापर करतात. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून पदपथावर गाडी असल्याने नागरिकांना रस्त्यावरूनच ये जा करावी लागते. परिणामी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
तसेच या पोलीस गाडीच्या भोवती कचरा, गवत वाढल्याने डास वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ लोक कचरा टाकत असल्याने उद्यानात येणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच गावठाणातील रहिवाशांना डासांचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणचा कचरा नियमित उचलून स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.





