आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी..

पुणे -राज्यातील पटावर असलेल्या आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करुनच संच मान्यता करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांची पडताळणी करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.
30 नोव्हेंबर 2022 ची विद्यार्थी संख्या गृहीत धरुन त्यावर शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे निश्चित करण्यासाठी संच मान्यतेची प्रक्रिया करावी लागत आहे. संच मान्यता अंतिम करण्यासाठी 15 जून पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. एनआयसीमार्फत ऑनलाइन पद्धतीने संच मान्यता करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत 80 टक्के विद्यार्थी वैध विचारात घेवून अंतरिम संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत. शाळांकडून विद्यार्थी वैध करण्याची कार्यवाही सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यांमुळे शाळेतील शाळेतील सन 2022-23 च्या मंजूर पदावर विपरीत परिणाम होत असल्यास संबंधित शाळांनी तालुका गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे विद्यार्थ्यांच्या यादीसह अर्ज करावे लागणार आहेत. संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची खात्री करावी लागणार आहे.
योग्य ती खात्री करूनच कारवाई…
शालेय विद्यार्थ्यांपैकी ज्यांचे आधार अवैध ठरलेल्या व आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य ती खात्री करुनच पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी लागणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी संपत सूर्यवंशी यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश बजावले आहेत.





