Venezuela : पुन्हा निवडणुकीची मागणी, राष्ट्राध्यक्ष मादुरोंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ विरोधात घेतला मोठा निर्णय…

कराकस : व्हेनेझुएलामध्ये सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष वाढत आहे. निवडणुकीतील पराभवानंतरही निकोलस मादुरो पदावर कायम असल्याचा आरोप विरोधी पक्षांचे नेते करत आहेत. विरोधकांसह अनेक देश मादुरो यांच्या पराभवाचा दावा करत आहेत आणि त्यांच्या विरोधातील वाढता विरोध पाहता अध्यक्ष मादुरो यांनी आता विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विरोधक मादुरोच्या विरोधात सतत निदर्शने करत आहेत आणि मादुरो यांची बेकायदेशीर सत्ता काढून टाकण्यासाठी जनतेला आवाहन करत आहेत. तसेच पुन्हा पुन्हा राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीची मागणी करत आहेत. तसेच विरोधी पक्ष नेते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर सतत निषेधाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहेत.
अशातच, व्हेनेझुएलामध्ये पुन्हा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मागणी होत आहे आणि या मागणीदरम्यान, विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स X’ विरोधात मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष मादुरो यांनी गुरुवारी सांगितले की, “व्हेनेझुएलामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) 10 दिवसांसाठी ब्लाॅक केले जाईल.” एक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनी फेरनिवडणुकीविरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर मादुरो यांनी हा निर्णय घेतला आहे.
मादुरो सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी….
निकोलस मादुरो हे सलग तिसऱ्यांदा व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी 11 वर्षांपासून सत्तेची धुरा सांभाळली आहे. मात्र, यावेळी विरोधी नेते आणि पक्षांच्या एकजुटीमुळे अध्यक्ष मादुरो यांना पहिल्यांदाच सर्वात कठीण निवडणूक आव्हानाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत मादुरो यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी 74 वर्षीय एडमंडो गोन्झालेझ उरुतिया हे होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सुमारे दोन कोटी नोंदणीकृत मतदारांनी मतदान केले. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस मादुरो यांना 51 टक्के मते मिळाली. तर विरोधी पक्षनेते एडमंडो गोन्झालेझ यांना 44 टक्के मते मिळाली.
विरोधी उमेदवार डमंडो गोन्झालेझ यांनी दिले आव्हान…
सध्याचे विरोधी पक्षाचे उमेदवार एडमंडो गोन्झालेझ हे त्यांच्या विजयाला आव्हान देत आहेत. गोन्झालेझ आणि विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी पत्रकारांशी बोलताना दावा केली की, मादुरो यांना केवळ 30 टक्के मते मिळाली आहेत, तर विरोधी पक्षनेते एडमंडो गोन्झालेझ उरुतिया यांना 67 टक्के मते मिळाली आहेत. असा दावा विरोधी नेत्यांनी टॅली शीटवर आधारित नवीन निवडणूक निकाल जाहीर केला आहे.
खरेतर, व्हेनेझुएलाच्या अध्यक्षीय निवडणुकीत विरोधी पक्षनेते गोन्झालेझ उरुतिया यांचा विजय अमेरिका आणि अर्जेंटिनासह अनेक देशांनी मान्य केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुइझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी व्हेनेझुएलाच्या सरकारला राष्ट्रपती निवडणुकीतील मतदानाचा डेटा जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.
विरोधकांनी मादुरोंना केला विरोध …
28 जुलै रोजी लागलेल्या निकालानंतर व्हेनेझुएलामध्ये गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. हजारो समर्थक विरोधी उमेदवार एडमंडो गोन्झालेझ यांच्या समर्थनार्थ राजधानी कराकस येथील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाबाहेर जमले. येथील निदर्शनांमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. दरम्यान, मादुरोचे मित्रपक्ष विरोधी पक्षांच्या नेत्यांवर फॅसिस्ट असल्याचा आरोप करताना टेलिव्हिजनवर दिसले.





