काय सांगता ! भारतातील ‘या’ गावात लोक बूट, चप्पल घालत नाहीत.. हॉस्पिटलमध्ये जात नाहीत

नवी दिल्ली – सध्या लोकांना बूट-चप्पलशिवाय एक पाऊलही चालणे कठीण झाले आहे. तुम्ही तरी शूजशिवाय कायमचे जगू शकता? कदाचित याची कल्पनाही करता येणार नाही, पण भारतात एक अनोखे गाव आहे, जिथे लोक चपलाशिवाय अनवाणी राहतात. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या गावातील लोक दवाखान्यातही जात नाहीत. कुणी खासदार किंवा जिल्हा दंडाधिकारी गावात आले तर त्यांनाही गावाबाहेर चपला काढाव्या लागतात.
सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथले लोक शूज आणि चप्पल न घालता लांबचा प्रवास करतात. हे गाव भारतातील इतर गावांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. वेमना इंदलू असे या गावाचे नाव असून ते आंध्र प्रदेशात आहे. हे गाव तिरुपतीपासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. या गावात 25 कुटुंबातील एकूण 80 लोक राहतात.
या गावात जेव्हापासून लोक राहतात तेव्हापासून ही परंपरा चालत आल्याचे सांगितले जाते. बाहेरून कोणी आले तर आंघोळ केल्याशिवाय या गावात प्रवेश करता येत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार या गावातील बहुतांश लोक निरक्षर आहेत. येथील लोक फक्त शेतीवर अवलंबून आहेत. गावकरी कोणत्याही अधिकार्यापेक्षा त्यांचे दैवत आणि सरपंचाचे जास्त पालन करतात.
या गावात पालवेकरी समाजाचे लोक राहतात, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. हे लोक स्वत:ची ओळख डोरावरलू म्हणून करून देतात. आंध्र प्रदेशातील या जातीचा मागासवर्गात समावेश होतो. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे येथे कोणीही दवाखान्यात जात नाही.
लोकांचा असा विश्वास आहे की ते ज्या देवाची पूजा करतात ते त्यांचे रक्षण करतील. इथले लोक तिरुपती येथे वेंकटेश्वराची पूजा करायलाही जात नाहीत. येथील लोक फक्त गावातील मंदिरातच पूजा करतात. आजारी पडल्यावर लोक गावात असलेल्या कडुलिंबाच्या झाडाभोवती फिरतात. मंदिराभोवती फिरतील, पण दवाखान्यात येथील माणसे अजिबात जात नाहीत.
गावाचा अनोखा नियम
बाहेरून येणारे लोक अंघोळ करूनच गावात प्रवेश करू शकतात असा कडक नियम या गावात आहे. याशिवाय चप्पल-बूट घालून गावात कोणीही जाऊ शकत नाही. अधिकाऱ्यांनीही हा नियम काटेकोरपणे पाळावा. मासिक पाळीच्या काळात महिलांना गावाबाहेर राहावे लागते. त्यांना सर्व काही गावाबाहेर दिले जाते.





