Satara news : वारकऱ्यांसह भाविकांच्या वाहनांना पथकारातून सूट : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : आगामी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविक आणि वारकऱ्यांसाठीच्या सोयी- सुविधा, त्यांच्या वाहनांना पथकारातून सूट देणे आणि वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली होती. त्यानुसार वारी मार्गावर मानाच्या पालख्या, वारकऱ्यांसह भाविकांच्या वाहनांना पथकारातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
रस्ते दुरुस्तीसह ठिकठिकाणी वारकऱ्यांना आवश्यक सोयी- सुविधा पुरवण्याच्या सूचना संबंधित विभागांना करण्यात आल्याचे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ना. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांना ‘आषाढी एकादशी २०२५, गाडी क्रमाांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस, संबंधित आर.टी.ओ. यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेसमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व पथकर नाक्यावर स्वतंत्र पोलीस यंत्रणा ठेवणे तसेच परिवहन विभागाने जादा बसेस गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीनपरिस्थितीचा सामना करण्यासाठी मुांबई- पुणे द्रुतगती मार्ग तसेच राज्यातील इतर सर्व संबंधित रस्ते/ महामार्गावर रुग्णवाहीका व क्रेनची व्यवस्था करणे, मुंबई- कोल्हापूर बंगलोर, पुणे- सोलापूर आदी राष्ट्रीय मार्गावर सुद्धा क्रेनची व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गरज भासल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी जड वाहनास आवश्यकता असल्यास बंदी घालण्याबाबत परिवहन विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामीण पोलीस, आर.टी.ओ. यांच्यामार्फत दिले जाणारे कुपन्स, पावती यांची संख्या याबाबत एकत्रित माहिती संबंधित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास/ सा.बां. विभाग/ NHAI कार्यालये यांना माहितीसाठी सादर करावी. जेणेकरून भाविक व वारकरी वाहनांना पथकरातून सवलत सवलत दिल्यानंतर संबंधित उद्योजकांना State Budget मधून नुकसान भरपाई देणेत येईल.
सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी
नाक्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ, ट्रॅफिक वॉर्डन व हँड होल्डिंग मशीन ठेवण्यात यावेत, पथकर कंत्राटदारांनी संबंधित रस्त्याच्या क्षेत्रात परिसरात वाहतूक पोलिसांसाठी आषाढी एकादशीच्या काळात जादाचे ट्राफिक वरदान डेल्टा किंवा एम.एस.एस. फोर्स उपलब्ध करुन द्यावेत.
पोलीस व परिवहन विभागाने आषाढी एकादशीच्या काळात पास सुविधा आणि त्याच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना/ जाहीर प्रसिद्धी करावी. अशा सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून आषाढी एकादशी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
पालखी मार्ग रस्ता सुस्थितीत ठेवा
सदर कालावधीत रस्ता सुस्थितीत आणण्याची कामे राष्ट्रीय महामार्ग विभाग व NHAI ने तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश दिले आहेत. दर २० ते २५ किमी अंतरावर पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी यंत्रणांनी संयुक्तिक रुग्णवाहीका, रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठीचे मटेरियल, क्रेन आदी व्यवस्था ठेवावी. तसेच बऱ्याच महामार्गावर रस्ते सुधारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
अशा ठिकाणी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्ट्टीकोनातून संबंधित महामार्ग प्राधिकाऱ्यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी. महाराष्ट्र राज्यातून पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व पथकर नाक्यांवर उपरोक्त कालावधीत पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सुट द्यावी व राज्य परीवहन (S.T.) विभागाच्या अधिकाऱ्यांनी गरजेनुसार संबंधित पोलीस ठाण्याकडे या अनुषंगाने कुपन, पास प्राप्त करुन घ्यावेत.





