Pimpri News: जुलै महिन्यात वाहन खरेदी सुसाट! दुचाकी, कार आणि व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीत मोठी वाढ
Pimpri News: इतर वाहनांच्या विक्रीत वाढ होत असली तरी तीनचाकी आणि ट्रॅक्टरच्या नोंदणीत मात्र घट

इनुराद विश्वकर्मा
पिंपरी – वाहन उद्योग क्षेत्रासाठी जुलै महिना खूपच दिलासादायक ठरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जुलै महिन्यात दुचाकी, कार आणि व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
आॅगस्ट महिन्याच्या पूर्वाधात देखील ही तेजी कायम आहे. इतर वाहनांच्या विक्रीत वाढ होत असली तरी तीनचाकी आणि ट्रॅक्टरच्या नोंदणीत मात्र घट झाली आहे. व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीत ३२.१ टक्के, तर दुचाकींच्या नोंदणीत २९.१ टक्के वाढ झाली आहे.
जुलै २०२६ मध्ये १२ हजार ५४२ दुचाकींची नोंदणी झाली. मागील वर्षी ही संख्या सुमारे ९ हजार ७१७ होती. त्यामुळे यंदा सुमारे २ हजार ८२५ दुचाकी अधिक नोंदल्या गेल्या आहेत. कारच्या नोंदणीतही वाढ झाली असून, यंदा ५ हजार ५३४ कार नोंदविण्यात आल्या. मागील वर्षी हा आकडा सुमारे ४ हजार ५७७ होता. त्यामुळे कार नोंदणीत २०.९ टक्के वाढ झाली आहे.
वैयक्तिक वाहनांच्या खरेदी वगळता व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीतही लक्षणीय वाढ दिसून आली. जुलै २०२६ मध्ये १ हजार ४६८ व्यावसायिक वाहनांची नोंदणी झाली, तर मागील वर्षी सुमारे १ हजार १११ वाहनांची नोंदणी झाली होती. यंदा सुमारे ३५७ व्यावसायिक वाहने अधिक नोंदविण्यात आली असून, या प्रकारातील वाहन नोंदणीत ३२.१ टक्के वाढ झाली आहे.
तीनचाकी वाहनांच्या नोंदणीत मोठी घट झाली आहे. शहरात नवीन प्रवासी रिक्षांना परवाना मिळत नसल्याने तीनचाकी वाहनांच्या नोंदणीत घट दिसून येत आहे. यंदा ३०७ तीनचाकी वाहनांची नोंदणी झाली असून, मागील वर्षी सुमारे ६३६ तीनचाकी नोंदल्या गेल्या होत्या. जुलै २०२६ मध्ये तीनचाकी वाहनांच्या नोंदणीत तब्बल ५१.८ टक्के घट झाली आहे.
मागील वर्षी जुलैमध्ये सुमारे ६३६ तीनचाकी वाहनांची नोंदणी झाली होती, तर यंदा हा आकडा ३०७ वर आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये जुलै २०२६ मध्ये ट्रॅक्टर नोंदणीत १७.६ टक्के घट झाली असली, तरी देशभरातील ट्रॅक्टर बाजाराचा कल याच काळात सकारात्मक राहिला आहे.
जुलैमध्ये देशातील ट्रॅक्टर किरकोळ विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे २८ टक्के वाढ नोंदवली गेली. शहरात ट्रॅक्टरच्या नोंदणीत घट झाली असून, यंदा १३६ ट्रॅक्टर नोंदविण्यात आले. मागील वर्षी ही संख्या सुमारे १६५ होती.
उद्योगनगरीसाठी दिलासादायक
पिंपरी-चिंचवड व आसपासच्या परिसरात सुमारे दहा वाहन निर्मात्या कंपन्या (ओईएम) आहेत. या कंपन्यांना विविध पार्टस आणि सेवा पुरविणारे दहा हजारांहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग आहेत. या उद्योगांवर लाखो कामगारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. वाहन क्षेत्रातील तेजी शहराच्या अर्थव्यवस्थेसाठी उत्तम मानली जाते. यामुळे जुलै आॅगस्टमध्ये वाढलेली विक्री उद्योगनगरीसाठी दिलासादायक आहे.
ही आहेत कारणे
जीएसटी दरांचे सुसूत्रीकरण, आरबीआयच्या रेपो दरातील कपात आणि प्राप्तिकरातील सवलतींमुळे ग्राहकांची वाहन खरेदीची क्षमता आणि कर्जाच्या उपलब्धतेला चालना मिळाल्याचे वाहन क्षेत्रातील चित्र आहे. त्याचबरोबर बाजारात दाखल झालेली नवीन मॉडेल्स, विशेषतः एसयूव्ही वाहनांची कायम असलेली मागणी, यामुळेही ग्राहकांचा कल वाहन खरेदीकडे राहिला.
त्यातच स्टील, अॅल्युमिनियमसह विविध कच्च्या मालाच्या किमती, उत्पादन प्रक्रिया आणि इतर संबंधित खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किमती वाढविण्याचा मार्ग स्वीकारला जात आहे. भविष्यामध्ये वाहनांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. यामुळे देखील वाहन विक्रीत सध्या तेजी दिसत असल्याने या क्षेत्रातील काही जाणकार सांगत आहेत.
पर्यायी इंधनांची जोरदार टक्कर
पिंपरी-चिंचवडसह देशाभरात पेट्रोल वाहनांच्या तुलनेत पर्यायी इंधनावरील प्रवासी वाहनांचा वाटा झपाट्याने वाढत आहे. प्रवासी वाहन बाजारात सीएनजीचा वाटा २४.६७ टक्के, हायब्रीड वाहनांचा ८.०२ टक्के आणि इलेक्ट्रिक वाहनांचा ७.९ टक्के आहे. म्हणजेच पर्यायी इंधनावरील वाहनांचा एकत्रित वाटा ४०.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
पेट्रोल आणि पर्यायी इंधनावरील वाहनंामध्ये आता केवळ १.१० टक्के इतके अंतर राहिले आहे. वर्षभरापूर्वी हे अंतर १३.२१ टक्के होते. अवघ्या एका वर्षात पर्यायी इंधनांच्या वाहनांनी पेट्रोल वाहनांच्या बाजारातील अंतर मोठ्या प्रमाणात कमी केले आहे.
‘पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाबाबत असलेला संभ्रम तसेच युद्धजन्य परिस्थितीमुळे एप्रिल, मे आणि जून महिन्यात अनेक ग्राहकांनी वाहन खरेदीचा निर्णय काही काळ पुढे ढकलला होता. मात्र जुलै महिन्यात हा संभ्रम बऱ्याच प्रमाणात दूर झाला आणि वाहन खरेदीला पुन्हा चांगली चालना मिळाली. जून महिन्यापासून ग्राहकांना विविध सवलती आणि ऑफर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या.
तसेच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ते १७ ऑगस्टच्या लाँग वीकेंडमध्ये वाहनांच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी काळात वाहनांच्या किमतीत ३ ते ५ टक्क्यांपर्यंत, म्हणजेच सुमारे ३० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांकडून वाहन खरेदीला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याची वाहन विक्रीही चांगली राहण्याची अपेक्षा आहे.’ – अनिकेत गारवे, व्यवस्थापकीय संचालक, गारवे स्कोडा, गारवे टाटा (फोटो)
‘सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे वाहनांच्या इंजिनवर इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे इथेनॉल मिश्रणाबाबत ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम आता कमी झाला आहे.जुलै महिन्यातील वाहन विक्रीला मिळालेला प्रतिसाद पाहता, त्यामागे विविध मॉडेल्सवर उपलब्ध असलेल्या आकर्षक सवलती आणि ऑफर्स हा मोठा घटक होता. वाहनांच्या किमतीत वाढ होत असली तरी आगामी काळातही वाहन खरेदीचा कल कायम राहून अधिक गाड्यांची विक्री होण्याची अपेक्षा आहे.’ – विनायक गारवे, व्यवस्थापकीय संचालक, गारवे ह्युंदाई, गारवे होंडा, गारवे रेनॉल्ट
Pune District : सोमेश्वर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम





