पुणे जिल्हा | वाशेरेचा पिण्याच्या पाणीप्रश्न मार्गी ; पाझर तलावाच्या कामाचे भूमिपूजन

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या वाशेरे येथील एमआय टँक (पाझर तलाव)चे भूमिपूजन रविवारी (दि. 6) म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. वाशेरे आणि परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे
याप्रसंगी जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, जिल्हा संघटक महादेव लिंभोरे, अंबर सावंत, मारुती सातकर, सरपंच संभाजी कुडेकर, म्हातारबाबा कुडेकर, गणेश कडलग, सचिन चौधरी, संपत आढाव, नाथा बच्चे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
वाशेरे गावासह साबुर्डी, साबूर्डीच्या वाड्या वस्त्या, कोहिंडे, रौंधळवाडी, कंदवाडी, गारगोटवाडी, देवोशी औदर, वाजवणे, सुपेवाडी आदी गावासाठी येथील एमआय टँक (पाझर तलाव) वरदान ठरणार आहे. या तलावातील पाण्यावर 250 हेक्टर जमीन क्षेत्र सिंचनाखाली येणार असून वाशेरे गावाची तहान भागणार आहे.
वाशेरे गावच्या दाक्षिलेला असलेल्या चुंडीचा झुरा हा भाग आहे. दोन्ही बाजूने उंच डोंगर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारा ओढ्याचा (झुर्याचा) मार्ग आहे. तर दोन्ही बाजूने उंच दरीचा डोंगर आहे.
त्यामुळे या ठिकाणी होणार्या एमआय टँकमध्ये मोठ्या क्षमतेने पाणी साठणार आहे. या पाण्यावर परिसरातील 250 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून वाशेरे गावासह त्याच्या वाड्यावस्त्या आणि परिसरातील गावातील पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सुटणार आहे.
वाशेरे येथे एमआय टँक (पाझर तलाव) होण्यासाठी माजी सरपंच संभाजीराजे कुडेकर यांनी शासन पातळीवर गेली अनेक वर्षे पाठपुरावा केला होता. माजी खासदार आढळराव पाटील आणि जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा प्रश्न मांडून पाठपुरावा केला होता. या कामासाठी 35 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे.





