परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी तसेच अंतर्गत येणा-या विविध महाविद्यालयांना भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीद्वारा प्रतिष्ठेचे ए ग्रेड मानांकन प्राप्त झाले. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने ४०व्या बैठकीत विद्यापीठास १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीसाठी अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली. या मूल्यांकनात विद्यापीठास उच्चांकी ३.२१ गुण प्राप्त झाले आहेत. ही अधिस्वीकृती विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनातील सातत्य व विस्तार सेवांतील कार्यक्षमतेची अधिकृत पावती आहे. अधिस्वीकृती समितीने २५ ते २९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान परभणी मुख्यालयासह लातूर, बदनापूर, अंबाजोगाई, धाराशिव, गोळेगाव (जि. हिंगोली) व चाकूर (जि. लातूर) येथील महाविद्यालयांना भेटी देत सखोल मूल्यांकन केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली सर्व महविद्यालयांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, सर्व विभागाच्या प्रमुखांनी, प्राध्यापकांनी आपले कार्य सादर केले. या कामगिरीचा सखोल आढावा त्यावेळी समितीने घेतला होता. त्यावेळी विद्यापीठात शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्यात सातत्यपूर्ण प्रगती, शेतकरी हिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, तसेच भौतिक सुविधांचा प्रभावी वापर आदी बाबींचे समितीने विशेष कौतुक केले होते. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, हे यश संपूर्ण विद्यापीठ समुदायाच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. राष्ट्रीय पातळीवर कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार क्षेत्रात विद्यापीठाचा प्रभाव अधिकाधिक वाढेल. या मानांकनामुळे विद्यापीठ विद्यार्थी केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी केंद्रित विस्तार कार्य आणि कर्मचारी केंद्रित प्रशासन राबविण्यास अधिक कटिबद्ध राहील.