मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती वसंतराव भालेराव हे स्वतः कृषी पदवीधर असल्याने त्यांनी शेती पीक उत्पादन आणि शेतकऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या प्रति वसंतराव भालेराव यांना मोठी आस्था होती, अशी माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. कळंब (ता.आंबेगाव) येथे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव यांच्या अंत्यविधीप्रसंगी श्रद्धांजली वाहतांना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले, वसंतराव भालेराव हे आगळे वेगळे व्यक्तिमत्व होतं. त्यांना एक दीड वर्षांपूर्वी दुर्धर आजार झाला होता. त्यांच्यावर विविध नामांकित रुग्णालयात उपचार केले. कुटुबीयांनी त्यांना आजारातून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. वसंतराव भालेराव सर्व कामे प्रामाणिकपणे करत होते. त्यांच्या मनासारखे झाले नाही तर कधी त्यांनी बोलून दाखवले नाही. यापूर्वी काळात मार्केट कमिटीचे सभापतीपद त्यांनी भूषवले असून यावेळी संचालक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना पुन्हा सभापती पदाची संधी दिली. सभापती असताना त्यांनी बाजार समितीमध्ये व्यापारी, मापाडी, हमाल यांचे प्रश्न सोडवण्याचे देखील काम केले. त्यांच्या जाण्याने यांच्या कुटुंबीयात व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भालेराव कुटुंबीयांच्या दुःखात पक्ष व आम्ही सर्व सहभागी असून आम्हीं सर्व मित्र परिवार त्याच्या पाठीशी आहोत. असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. यावेळी चैतन्य महाराज कबीर यांनी श्रद्धांजली वाहिली. माजी उपसरपंच डॉक्टर सचिन भालेराव यांनी प्रास्ताविक केले. तर, सूत्रसंचालन प्रताप भालेराव यांनी केले.