Maharashtra Politics : वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीनंतर स्थानिक राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रमुख तसेच ज्येष्ठ जिल्हा सचिव ॲड. साधना धुरी यांनी बहुजन विकास आघाडीत (बविआ) जाहीर प्रवेश केला. 25 फेब्रुवारी रोजी हा प्रवेश सोहळा पार पडला. बविआचे अध्यक्ष व माजी आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील, माजी महापौर नारायण मानकर आणि ज्येष्ठ नेते जितूभाई शहा यांच्या उपस्थितीत धुरी यांनी पक्षप्रवेश केला. भाजपमधील अंतर्गत मतभेदांचा आरोप भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचा आरोप करत साधना धुरी यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्त्यांनीही बविआत प्रवेश केला. या वेळी भाजपमधून यापूर्वीच बविआत दाखल झालेले चंद्रशेखर धुरी देखील उपस्थित होते. भाषणात साधना धुरी यांनी कोणाचेही नाव न घेता “खरे संघर्ष नेते हितेंद्र ठाकूर आहेत,” असा टोला भाजप आमदारांना लगावला. महानगरपालिका निवडणुकीनंतर बविआत ‘इनकमिंग’ सुरू झाल्याने वसई-विरारच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.