वरुण धवनचा पुणे मेट्रोतून प्रवास; नेटकऱ्यांनी केलं साधेपणाचं कौतुक

Varun Dhawan in Pune Metro | बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता वरुण धवन याचा पुणे मेट्रोतून प्रवास केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी त्याच्यासोबत अभिनेता आहान शेट्टी देखील होता. दोघांचाही मेट्रोतून प्रवासाचा व्हिडिओ अभिनेता आहान शेट्टीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
वरुण धवनने स्वतः तिकीट बुक केल्याचा आणि मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवरून प्रवास केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यात वरुण धवन म्हणतो की, ‘आम्ही सध्या पुण्यात आहोत. आम्ही हरवलो आहोत, तर आम्ही आता मेट्रोमधून प्रवास करत हॉटेलपर्यंत पोहोचणार आहे’. त्यानंतर ते पुण्याच्या मेट्रोमधून प्रवास करताना दिसत आहेत. त्यांनी यादरम्यान चेहर्यावर मास्क लावला आहे. त्यांनी काही वेळ बसून, तर काही वेळ गर्दीत उभे राहून प्रवास केल्याचे दिसत आहे. अनेकांनी या दोघांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
‘बॉर्डर २‘ या चित्रपटाचे सध्या शुटींग सुरू असून यात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अभय शेट्टी हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सध्या पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA)मध्ये सुरू आहे. या सगळ्यात अभिनेता वरुण धवन व आहान शेट्टी यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करीत आहेत आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता व निधी दत्ता यांनी निर्मिती केली आहे. ‘बॉर्डर २’ हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
समाजवादी पक्षाची मोठी कारवाई ; ‘या’ कारणामुळे तीन आमदारांची हकालपट्टी





