Varun Dhawan Daughter Health: मुलीच्या आजाराने वरुण धवन व्यथित; म्हणाला ‘साधं चालणंसुद्धा तिच्यासाठी कठीण’
Varun Dhawan Daughter Health लारा धवनचा जन्म ३ जून २०२४ रोजी झाला होता. या वर्षी ती दोन वर्षांची होणार आहे. मात्र, तिच्या चालण्यामध्ये अडचणी येत असल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांकडे तपासणी केली असता हा आजार असल्याचं निदान झालं.

Varun Dhawan Daughter Health: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या वैयक्तिक आयुष्यातील एका भावनिक प्रसंगामुळे चर्चेत आला आहे. आपल्या दोन वर्षांच्या मुलीच्या आरोग्याबाबत त्याने नुकताच मोठा खुलासा केला असून, ही माहिती ऐकून चाहत्यांनाही धक्का बसला आहे. वरुण आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांची मुलगी लारा धवन हिला “डेव्हलपमेंटल डिस्प्लेशिया ऑफ हिप्स” (DDH) हा आजार असल्याचं समोर आलं आहे.
लारा धवनचा जन्म ३ जून २०२४ रोजी झाला होता. या वर्षी ती दोन वर्षांची होणार आहे. मात्र, तिच्या चालण्यामध्ये अडचणी येत असल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांकडे तपासणी केली असता हा आजार असल्याचं निदान झालं. DDH या आजारात कूल्ह्याचा सांधा योग्य ठिकाणी बसलेला नसतो, त्यामुळे चालणं, धावणं यामध्ये अडथळे येतात.
एका मुलाखतीत बोलताना वरुण धवनने सांगितलं की, “हा आजार लगेच लक्षात येत नाही. लारा दीड वर्षांची झाल्यावर आम्हाला याची कल्पना आली. काही वेळा स्लिप डिस्क किंवा सांधेदुखीसारख्या समस्या लवकर ओळखता येत नाहीत.” त्याने हेही नमूद केलं की, पाश्चात्य देशांमध्ये जन्मत:च या आजाराचं निदान आणि उपचार अधिक व्यवस्थित पद्धतीने होतात, मात्र भारतातही आता चांगले डॉक्टर उपलब्ध आहेत.
View this post on Instagram
वरुणने पुढे सांगितलं की, सध्या लाराला शस्त्रक्रियेची गरज पडलेली नाही. काही प्रकरणांमध्ये एका प्रक्रियेद्वारे कूल्ह्याचा सांधा योग्य जागी बसवला जातो. मात्र त्यानंतर बाळाला “स्पाइका कास्ट”मध्ये ठेवावं लागतं, जे खूप कठीण असतं. या प्रक्रियेदरम्यान मुलाला भूल दिली जाते आणि नंतर त्याची काळजी घेणं पालकांसाठीही भावनिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक ठरतं.
या सगळ्या अनुभवाबद्दल बोलताना वरुण धवन भावुक झाला. “एका वडिलांसाठी आपल्या मुलाला त्रास होताना पाहणं खूप वेदनादायक असतं. मला या अनुभवावर एक पुस्तक लिहावंसं वाटतं,” असंही त्याने सांगितलं.
वरुण धवन आणि नताशा दलाल यांचं लग्न २४ जानेवारी २०२१ रोजी अलिबाग येथे पार पडलं होतं. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न केलं होतं. सध्या दोघंही आपल्या मुलीच्या आरोग्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहेत.
लाराच्या आजाराबाबतची ही माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांकडून सहानुभूती आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वजण तिच्या लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.





