अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या निमित्ताने वारकऱ्याने गोपालकांना केला दोन टन चारा दान

नेवासा – अयोध्येतील श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या निमित्ताने नेवासा बुद्रुक येथील संतसेवक पुंजाराम पेचे या वारकऱ्याने गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी केलेल्या आवाहनाला साद घालत गुजराथ येथील या भागात वास्तव्यास असलेल्या गोपालकांना आपल्या शेतातील सुमारे दोन टन चारा दान केला.
यावेळी बोलताना संतसेवक पुंजाराम पेचे म्हणाले की मी वारकरी संप्रदायातील अखंड हरिनाम सप्ताह व इतर होणाऱ्या कार्यक्रमात विणेकरी म्हणून सेवा देत असतो मी एक शेतकरी असून वारकरी देखील आहे.संत संगतीत राहून परमार्थ करत असतांना श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दि.२२ जानेवारी होत आहे.
या उत्सवाच्या निमित्ताने गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी या काळात दानधर्म व अन्नदान करून रामलल्लाचा मूर्ती प्राणप्रतिष्ठाचा सोहळा साजरा करण्याचे आवाहन केले होते.त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मी गुरुवर्य बाबांच्या प्रेरणेतून माझ्या शेतातील दोन टन उसाचा चारा गुजराथ येथील गोपालक जे येथे आपल्या गाई घेऊन वास्तव्याला आहे त्यांना दान केला असल्याचे सांगितले.
यावेळी भगवे झेंडे हातात घेऊन प्रभू रामचंद्र की जय असा जयघोष करत चार बैल गाड्या भरून चारा गोपालकांकडे सुपूर्त करण्यात आला.यावेळी विवेकरी पुंजाराम पेचे यांच्या समवेत पत्रकार सुधीर चव्हाण, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे सेवानिवृत्त क्रेन अकाऊंट निवृत्ती डौले,गोपालक वीरा वाघा भरवाड,मफा वाघा भरवाड,अर्जुन वाघा भरवाड,लखा वाघा भरवाड उपस्थित होते.यावेळी उपस्थित गोपालक व त्यांच्या कुटुंबियांना अल्पोपहार देऊन सन्मानीत करण्यात आले.वारकरी संतसेवक पुंजाराम पेचे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्थरावर कौतुक होत आहे.





